सोमवारपासून कॉलेजही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:36+5:302021-02-14T04:09:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ...

सोमवारपासून कॉलेजही सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शैक्षणिक विभाग व संबंधित महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यानुसार कॉलेज सुरू होण्यापूर्वी संबंधित कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच कोविडच्या गाईडलाईनचे काटेकोर पालन करणे आवश्यक राहील.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किती कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट झाली, याची माहिती विद्यापीठाकडे आलेली नाही. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे की, महाविद्यालयांना आपल्या स्तरावर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरटीपीसीआर टेस्ट करण्यास सांगण्यात आले आहे. ज्यामुळे किती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टेस्ट केली याची माहिती विद्यापीठाला मिळू शकलेली नाही. विद्यापीठाच्या अधिसूचनेत महाविद्यालयांना दिशानिर्देशही देण्यात आले आहेत. यात म्हटले आहे की, एकूण प्रवेश क्षमता ५० टक्के विद्यार्थ्यांना एक दिवसाआड बोलावण्यात येईल. विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के आवश्यक असलेली उपस्थितीची अट रद्द केली आहे. महाविद्यालय व वसतिगृहाचे सुरक्षा ऑडिट करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय महाविद्यालयांना राज्य सरकारतर्फे जारी केलेले कोविड गाईडलाईनचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थी आनंदात आहेत, तर पालक चिंतेत पडले आहेत. पालकांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसापासून शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत पाल्यांना महाविद्यालयात पाठविण्याबाबत भीती आहे. महाविद्यालयातील प्राचार्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी सर्व तयारी केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांना वर्गात बसताना सुरक्षित अंतर राहील, याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.