नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
By निशांत वानखेडे | Updated: December 22, 2025 19:30 IST2025-12-22T19:30:42+5:302025-12-22T19:30:56+5:30
महिनाभर थंडीची अनुभूती, नाताळदरम्यान थंड लाटेची शक्यता

नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
निशांत वानखेडे, नागपूर: मागील ३० नाेव्हेंबरपासून सुरू झालेल्या कडाक्याच्या थंडीचा त्रास डिसेंबरच्या उरलेल्या ९ दिवसपर्यंत कायम राहणार आहे. म्हणजे संपूर्ण महिना थंडीचा तडाखा अनुभवायला मिळणार आहे. येणारा नाताळही गारेगार राहणार असून आता थेट नववर्षाच्या सलामीलाच थंडी काहीशी कमी हाेण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
डिसेंबरचे पहिले दाेन दिवस वगळता थंडीचा तडाखा आज २२ डिसेंबरपर्यंत राहिलेला आहे. विदर्भातील काही जिल्हे व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचा प्रभाव अधिक राहिला आहे. हा गारठा २८ डिसेंबरपर्यंत असाच राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे नाताळ सणादरम्यानच्या काळात महाराष्ट्रात थंडीच्या लाटांची शक्यताही व्यक्त केली जात आहे. खान्देशातील जळगांव, नंदुरबार सह विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात दिवसाही थंडाव्यातून गारवा जाणवेल व हूडहुडी भरेल. त्यानंतर २९ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२६ पर्यंत ९ दिवसात पहाटे ५ दरम्यानच्या किमान तापमानात वाढ होवून काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते. छत्तीसगडसह मध्य भारतात उद्भवलेल्या कमकुवत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यांना अटकाव हाेत असल्याने थंडीचा हा बदल जाणवेल, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
नागपूरमध्ये गारठा कायम, गाेंदिया सर्वात गार
दरम्यान साेमवारी नागपूरच्या किमान तापमानात १ अंशाची वाढ हाेत ९.२ अंशाची नाेंद झाली. तापमान वाढले तरी गारठा काही कमी झाला नाही. सकाळपासून काहीशा ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांना अटकाव झाल्याने दिवसाही गारवा जाणवत राहिला. ८.४ अंशासह गाेंदिया विदर्भात सर्वात थंड शहर ठरले. गाेंदियासह भंडारा जिल्ह्यातही ढगाळ वातावरणामुळे दिवसाचा पारा घसरला व अनुक्रमे २६.८ व २७ अंशाची नाेंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २४ तासात रात्रीचा पारा वाढण्याची व त्यानंतर पुन्हा घसरण हाेण्याची शक्यता आहे.