नागपूर गारठले! वातावरणात हिलस्टेशनचा फिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 22:45 IST2023-01-04T22:43:19+5:302023-01-04T22:45:02+5:30
Nagpur News बुधवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते आणि नागपुरात धुक्याची चादर पसरली हाेती. दिवसाचा पारा २४ तासांत ५.४ अंशांनी आणि सरासरीपेक्षा ६.५ अंशांनी खाली घसरला. त्यामुळे दिवसभर हुडहुडी भरली हाेती.

नागपूर गारठले! वातावरणात हिलस्टेशनचा फिल
नागपूर : मंगळवारपासून आकाशात जमलेल्या ढगांच्या गर्दीमुळे दिवसाच्या कमाल तापमानात अचानक माेठी घसरण झाली आहे. बुधवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते आणि नागपुरात धुक्याची चादर पसरली हाेती. दिवसाचा पारा २४ तासांत ५.४ अंशांनी आणि सरासरीपेक्षा ६.५ अंशांनी खाली घसरला. त्यामुळे दिवसभर हुडहुडी भरली हाेती. दिवसाचे तापमान घसरले; पण रात्रीच्या पाऱ्याने ५.२ अंशांची माेठी उसळी घेतली आहे.
बुधवारी दिवसभर नागपूरच्या वातावरणात माथेरान किंवा कुलू मनालीत असल्याचा फिल येत हाेता. अचानक घसरलेल्या पाऱ्याने गारठा चांगलाच वाढला हाेता. त्यामुळे नागपूरकरांना दिवसा काही हाेईना, इतक्या दिवसातून थंडीची जाणीव झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, बुधवारी दिवसाचे तापमान २४ तासांत ५.४ अंशांनी घसरून तब्बल २१ अंशांवर खाली आले. सरासरीपेक्षा ते ६.५ अंशांनी कमी हाेते. पुढचे दाेन दिवस असेच ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिवसाचा पारा घसरला असला तरी रात्रीच्या पाऱ्याने माेठी उसळी घेतली आहे. बुधवारी १७.२ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा ५.२ अंशांनी अधिक आहे.
दरम्यान, नागपूरसह संपूर्ण विदर्भात बुधवारी दिवसाच्या तापमानात माेठी घसरण झाल्याचे दिसून आले. बुलढाण्यात सर्वांत कमी १९.८ अंश तापमानाची नाेंद झाली. याशिवाय गाेंदिया २० अंश आणि ब्रह्मपुरी २१.२ अंश कमाल तापमान नाेंदविण्यात आले. इतर ठिकाणीही दिवसाच्या पाऱ्यात ४ ते ७ अंशांपर्यंत घसरण झाल्याचे दिसून आले. बहुतेक शहरात धुके पसरले व गारठा वाढला हाेता. रात्रीचे तापमान मात्र सगळीकडे वधारले हाेते. नागपूरची दृष्टिता १ ते २ किलाेमीटरपर्यंत खाली आली.