नाणे टंचाई, व्यापारी त्रस्त
By Admin | Updated: April 26, 2015 02:24 IST2015-04-26T02:24:18+5:302015-04-26T02:24:18+5:30
नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आल्याचे बाजारात चित्र आहे.

नाणे टंचाई, व्यापारी त्रस्त
नागपूर : नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आल्याचे बाजारात चित्र आहे. नाणे टंचाईला व्यापारी वैतागले असून काहीजण टक्केवारीने नाण्यांचा काळाधंदा करीत आहेत.
भयानक नाणे टंचाईचा फायदा घेत काही मंडळी नाण्यांची टक्केवारीने विक्री करीत आहेत. त्यांचा नाणे विक्रीचा एक स्वतंत्र व्यवसायच बनला आहे. ही मंडळी विविध देवस्थान, भिकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साचलेली नाणी मिळवितात. नाणेनुसार वेगळी करून १०० रुपये किमतीच्या थैल्या बनवितात. व्यापाऱ्यांना नाण्यांची गरज भासते हे लक्षात घेऊन अशा व्यापाऱ्यांना ही मंडळी नाण्यांची थैली १० ते २० टक्के दर आकारून विकत देतात. असा हा काळाधंदा शहरात राजरोजपणे चालू आहे. आता ५० पैशालाही फारशी किंमत उरली नाही. नाण्यांसह नोटांच्या बाबतीतही तसेच घडले. एक आणि दोन रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर गेल्या, तर पाच रुपयांची नोट जरी अस्तित्वात असली तरी या नोटा अनेक वर्षांपासून रिझर्व्ह बँकेकडून नव्या कोऱ्या करकरीत स्वरूपात येणे बंद झाले. त्यामुळे पाच रुपयांच्या जुन्या फाटक्या नोटा पुन्हा पुन्हा बाजारात फिरू लागल्या.
रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा कोषागार शाखेला वर्षांतून तीन वेळा नवीन नोटा आणि नाण्यांचा पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे, हजार रुपये मूल्य असलेल्या नवीरन नोटा सातत्याने चलनात येत असतात. त्याचप्रमाणे एक रुपया, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयांच्या नवीन नाण्यांचा वर्षांतून तीन वेळा पुरवठा केला जातो, अशी परिस्थिती असतानाही बाजारपेठेत चिल्लरचा प्रश्न गंभीर का बनला याचा शोध घेतला असता, अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. नवीन नोटा आणि नाणी प्रथमत: जेव्हा बाजारात येतात तेव्हा नाविन्यपूर्ण कुतूहलापोटी चलनात हस्ते, परहस्ते फिरतच नाहीत, उलट त्यांचा संग्रह केला जातो. त्यामुळे आजही आपल्याला बाजारात १० रुपयांची नवीन नाणी चलनात येऊनसुद्धा पाहायला मिळत नाहीत. विविध मंदिरांच्या दानपेटीत भाविक चिल्लरची नाणी आवर्जून टाकतात. अनेक हॉटेल्समधून चिल्लर नाही, असे कारण सांगून त्याऐवजी चक्क चॉकलेटच ग्राहकांच्या हाती ठेवले जाते. अशा तऱ्हेने नाण्यांच्या टंचाईमुळे चॉकलेटचा धंदाही भरभराटीस आला आहे.
नाणे टंचाईचा फटका फक्त ग्राहकांना बसतो असे नव्हे, तर व्यापारीसुद्धा त्रस्त आहेत. नाणे विकत घेऊनसुद्धा ती कधी ना कधी संपते, मग पुन्हा त्यासाठीच त्रस्त व्हावे लागते. जेव्हा १७२ रुपये बिल होते तेव्हा व्यापारी वरचे २ रुपये कमी करून ग्राहकांकडून १७० रुपये घेतात. अशा प्रकारे आपला माल विकताना चिल्लरअभावी केवळ ग्राहक समाधानासाठी व्यापाऱ्यांना तडजोड करावी लागते.
चिल्लरची कटकट कायमची दूर होण्यासाठी एकतर सर्व प्रकारचे भाडे, मालाच्या किमती पूर्णांकात ठेवण्यात याव्यात किंवा रिझर्व्ह बँकेकडून चिल्लर मोठ्या प्रमाणात वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी, अशी व्यापारी आणि ग्राहकांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)