CM Devendra Fadnavis: नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरचेपोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि पोलिस उपायुक्त निकेतन कदम हेदेखील रस्त्यावर उतरले होते. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिस आयुक्त काही प्रमाणात जखमी झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काही आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली. त्यांना प्रथम मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकेतन कदम यांना फोन करत त्यांची विचारपूस केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले.
निकेतन कदम यांना केलेल्या फोन कॉलदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तुम्ही परिस्थितीचा चांगला सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही लवकर बरे व्हाल, ही प्रार्थना. यापुढेही तुम्ही असंच चांगलं काम कराल, असा आम्हाला विश्वास आहे."
दरम्यान, हल्लेखोरांकडून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला असून घाव खोलवर गेल्याचं उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितलं. तसंच त्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याची माहितीही कदम यांनी दिली.
अग्निशामक दलावरही दगडफेकया दगडफेकीत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच आग विझवण्यासाठी दाखल झालेले जवान यांच्यावरही जोरदार दगडफेक करण्यात आली.यावेळी आंदोलक दगड, चाकू फेकून मारत आहेत, अशी प्रतिक्रिया आग विझवायला गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. या घटनेत अनेक पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांवर वरच्या माळ्यांवरून हल्लाचिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाजकंटकांची धरपकड सुरू केली. अंतर्गत गल्ल्यांमध्ये गेलेल्या पोलिसांवर वरील मजल्यांवरून काही लोकांनी दगड फेकले, त्यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. संबंधित भागांमध्ये 'लोकमत'ने मध्यरात्री जाऊन पाहणी केली असता तेथे एरवी सामान्य घरांजवळ न सापडणारे मोठमोठे दगड, टाइल्सचे टोकदार तुकडे, लाकडी दांडे जागोजागी दिसून आले. याशिवाय ज्या पद्धतीने पोलिसांवर वरून दगड कुठे फेकण्यात आले त्यावरून हा ठरवून करण्यात आलेला प्रकार तर नव्हता ना, अशा प्रकारची शंका उपस्थित होत आहे.