ढगांची गर्दी ओसरतेय, दोन दिवसात वाढणार थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:08+5:302021-01-13T04:17:08+5:30
नागपूर : आकाशातील ढग ओसरायला लागले असून तापमानाचा पाराही आता खाली येणार आहे. हा बदल लक्षात घेता हवामान विभागाने ...

ढगांची गर्दी ओसरतेय, दोन दिवसात वाढणार थंडी
नागपूर : आकाशातील ढग ओसरायला लागले असून तापमानाचा पाराही आता खाली येणार आहे. हा बदल लक्षात घेता हवामान विभागाने येत्या दोन दिवसात तापमानात बरीच घट होण्याची शक्यता वर्तविली आहे.
मागील २४ तासात कमाल तापमान १.१ आणि किमान तापमान २.७ अंश सेल्सिअस होते. तरीही किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा ५ अंशाने अधिक म्हणजे १८.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. यामुळे थंडीचा परिणाम जाणवला नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालची खाडी आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्यभारताच्या अवकाशात आर्द्रता पसरली. यामुळे पारा वाढला. विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान व कमाल तापमान सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशावर असलेले दिसत आहे.
नागपुरात कमाल तापमान सामान्यापेक्षा ३ अंशाने अधिक ३१.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. रात्रीचे आणि दिवसाचे तापमान सामान्यापेक्षा जास्त असल्याने थंडीचा परिणाम जाणवला नाही. मात्र पुढील दोन दिवसानंतर पुन्हा थंडी परतण्याची शक्यता आहे.