बंद ‘एक्स-रे’ने, कसे होणार क्षयरोगाचे निर्मूलन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:20+5:302020-12-02T04:12:20+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : क्षयरोगाच्या निदानात ‘एक्स-रे’ महत्त्वाचा ठरतो. परंतु नागपूर जिल्ह्यातील कामठी, कुही व हिंगणा सोडल्यास इतर तालुक्याच्या ...

Closed X-rays, how to eradicate tuberculosis? | बंद ‘एक्स-रे’ने, कसे होणार क्षयरोगाचे निर्मूलन?

बंद ‘एक्स-रे’ने, कसे होणार क्षयरोगाचे निर्मूलन?

सुमेध वाघमारे

नागपूर : क्षयरोगाच्या निदानात ‘एक्स-रे’ महत्त्वाचा ठरतो. परंतु नागपूर जिल्ह्यातील कामठी, कुही व हिंगणा सोडल्यास इतर तालुक्याच्या ठिकाणातील ग्रामीण रुग्णालयात यंत्र असून नसल्यासारखेच आहे. सावनेर, पारशिवनी, काटोल व कळमेश्वरमधील जुनाट यंत्रामुळे एक्स-रे अस्पष्ट येतो. रामटेक, भिवापूर व नरखेड येथे तंत्रज्ञ नाही. उमरेडमध्ये चार वर्षांपासून यंत्र निकामी आहे, तर मौदामध्ये डार्करुम अभावी यंत्र बंद पडले आहे. विशेष म्हणजे, क्षयरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (एनएसपी) जाहीर केली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी १२ हजार कोटींची आर्थिक तरतूद आहे. हा पैसा जातो कुठे, असा प्रश्न आहे.

आरोग्याच्या समस्येबद्दल बोलायचे तर क्षयरोग (टीबी) भारतात सर्वात गंभीर रोग आहे. देशात दरवर्षी या रोगामुळे जवळपास सव्वादोन लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात. महाराष्ट्रात २०१७ मध्ये क्षयरोगाचे १,६४, ७४३ रुग्ण होते. २०१८ मध्ये हा आकडा २,०२,५७४ वर पोहचला. या रोगाने आतापर्यंत ३७ हजार ८०० रुग्णांचे बळी घेतले आहेत. धक्कादायक म्हणजे, क्षयरोगाला ‘रेझिस्टंट’ झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार २३० वर पोहचली आहे. सरकारने २०२५ सालापर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याची घोषणा केली आहे. हे ध्येय गाठण्यासाठी ‘एनएसपी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेतून सध्या अस्तित्वात असलेल्या निदान केंद्रांचे आणि उपचारसेवांचे बळकटीकरण, खासगी वैद्यकीय क्षेत्राचा अधिकाधिक समावेश आणि क्षयरुग्णांसाठी सामाजिक सहकार्य उपक्रमांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजनांची सुरुवात केली आहे. यामुळे काही बदल दिसून येत असला तरी ग्रामीण भागातील आवश्यक सोईवर अद्यापही लक्ष नसल्याचे चित्र आहे.

-क्षयरोग रुग्ण शोध मोहिम अडचणीत

१ ते १६ डिसेंबर या दरम्यान घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोग रुग्ण शोधमोहिम आजपासून नागपूर जिल्ह्यात सुरू झाली. परंतु बहुसंख्य ग्रामीण रुग्णालयात कालबाह्य व जुनाट यंत्र, तंत्रज्ञाचा अभाव व सोयीअभावी एक्स-रे बंद असल्याने ही मोहीम अडचणीत आली आहे.

-शासकीय रुग्णालयातील एक्स-रे मशीनची स्थिती

तालुका स्थिती

सावनेर जुने यंत्र, अस्पष्ट एक्स-रे

नरखेड तंत्रज्ञ नाही

कळमेश्वर तांत्रिक कारणाने बंद

काटोल २५ वर्षे जुनी, अस्पष्ट एक्स-रे

पारशिवनी जुने यंत्र व अस्पष्ट एक्स-रे

हिंगणा सुरू

उमरेड चार वर्षांपासून बंद

मौदा डार्क रुम अभावी बंद

रामटेक तंत्रज्ञ नाही

भिवापूर तंत्रज्ञ नाही

कामठी सुरु

कुही सुरू

-जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत नोंद झालेले नवे रुग्ण

नागपूर ग्रामीण-१,३६१ रुग्ण

नागपूर शहर-४६२५

-उपचार घेत असलेले एकूण रुग्ण व मृत्यू

नागपूर ग्रामीण-२८४३ रुग्ण, ८६ मृत्यू

नागपूर शहर-६४०८ रुग्ण, ४१४ मृत्यू

-‘एक्स-रे’साठी आऊटसोर्स करण्याचा प्रस्ताव

जिथे एक्स-रे मशीन बंद पडल्या आहेत किंवा जुनाट झाल्या आहेत, तेथील रुग्णांचे एक्स-रे काढण्यासाठी ‘आऊटसोर्स’ करण्याचा व रोजंदारीवर तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सहसंचालक आरोग्य सेवा कुष्ठ व क्षयरोग अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. आजपासून सुरू झालेल्या क्षय व कुष्ठरोगाच्या रुग्णांचा शोधमोहिमेत जिथे ‘एक्स-रे’ची सोय नाही तेथील रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने दुसऱ्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याचे नियोजन केले आहे.

-डॉ. ममता सोनसरे

जिल्हा क्षयरोग अधिकारी, नागपूर ग्रामीण

Web Title: Closed X-rays, how to eradicate tuberculosis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.