क्लिनिकवर हल्ला, डॉक्टरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:08 IST2021-01-19T04:08:51+5:302021-01-19T04:08:51+5:30
उपचाराने असमाधानी - पैसे परत मागितल्यामुळे वाद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - डॉक्टरच्या क्लिनिकवर हल्ला चढवून रुग्णाच्या नातेवाइकांनी ...

क्लिनिकवर हल्ला, डॉक्टरला मारहाण
उपचाराने असमाधानी - पैसे परत मागितल्यामुळे वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - डॉक्टरच्या क्लिनिकवर हल्ला चढवून रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरला चक्क बीपीच्या उपकरणाने मारहाण केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी दोघांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. ईस्तियाक गुलजार खान (वय २२) आणि ईलियास खान (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत. ते मानकापूरच्या संत ज्ञानेश्वर सोसायटीत राहतात. फिर्यादी डॉ. अब्दुल कयूम अलिम खान (वय ३७) यांचे गोरेवाडा रिंग रोडवर क्लिनिक आहे. त्यांच्याकडे आरोपीच्या आईने अस्थमाचे उपचार घेतले होते. त्यासाठी पन्नासेक हजार रुपये खर्च आला. मात्र, औषधाचा लाभ झाला नाही. त्यामुळे आरोपी चिडले. त्यांनी १५ जानेवारीच्या रात्री ९ वाजता डॉ. कयूम यांच्या क्लिनिकवर हल्ला चढवला. आईवर कोणते उपचार केले, ते लिहून दे आणि उपचाराच्या नावाने घेतलेली रक्कम परत कर, असे म्हणत त्यांनी वाद घातला. डॉक्टरांनी विरोध केल्याने आरोपींनी क्लिनिकमध्ये तोडफोड केली. डॉ. कयूम यांना बीपी तपासण्याच्या उपकरणाने मारले. तर, मदतीसाठी धावलेल्या त्यांच्या काकांना हेल्मेटने मारून जबर दुखापत केली. या प्रकारामुळे क्लिनिकमध्ये एकच धावपळ निर्माण झाली. डॉ. कयूम यांची मानसिक स्थिती खराब झाल्याने त्यांनी दोन दिवसांंनंतर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूरचे उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे यांनी रविवारी विविध कलमांनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी ईस्तियाकला अटक करण्यात आली, तर ईलियासचा शोध घेतला जात आहे.
----