वाठोडा भागातील नागरिकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:34+5:302021-02-11T04:09:34+5:30
गिरीश वर्मा यांचे मृत्यू प्रकरण : सदर पोलीस स्टेशनपुढे नारेबाजी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाठोडा ...

वाठोडा भागातील नागरिकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन ()
गिरीश वर्मा यांचे मृत्यू प्रकरण : सदर पोलीस स्टेशनपुढे नारेबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा परिसरातील तरोडी (खुर्द) येथील रहिवासी गिरीश वर्मा (५०) यांचा मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला.या भागातील साईसाठी आरक्षित जागेवर वर्मा यांनी घराचे बांधकाम केले. या परिसरातील अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले होते. याबाबतच्या वृत्तामुळे वर्मा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत, या भागातील नागरिकांनी मनपापुढे आंदोलन केले होते. आंदोलकांना सदर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बुधवारी सकाळी तरोडी व वाठोडा परिसरातील नागरिकांनी सदर पोलीस स्टेशनपुढे ठिय्या आंदोलन करून नारेबाजी केली.
दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांच्यासह २२ जणांना सदर पोलिसांनी अटक केली. परंतु आंदोलकांनी जामीन घेण्यास नकार दिला. अटक केलेल्यांची सुटका होत नाही तोवर मेडिकलमधून वर्मा यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतकांचे नातेवाईक व तरोडी परिसरातील नागरिकांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची सूचनापत्रावर सुटका केली. त्यानंतर वर्मा यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
गिरीश वर्मा यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बसपाचे प्रदेश सचिव उत्तम शेवडे यांनी यावेळी केली. रमेश लेकुरवाळे, आशिष मलेवार, शंकर थूल यांच्यासह वाठोडा भागातील कैलासनगर व तरोडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनपापुढे पोलीस बंदोबस्त
गिरीश वर्मा यांच्या मृत्यूमुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी मनपा कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले होते. पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता, बुधवारी दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांची सदर पोलिसांनी सुटका केल्यानंतर काही लोकांनी मनपा कार्यालयापुढे नारेबाजी केली. पोलीस बंदोबस्तामुळे आंदोलक निघून गेले.