नागरिकांचा बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:27+5:302021-04-18T04:08:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गुमथळा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने नागरिकांना काही उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन केले असले, तरी ग्रामीण ...

Citizens' irresponsibility on Kareena's path | नागरिकांचा बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर

नागरिकांचा बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर

लाेकमत न्यूज नेटवर्क

गुमथळा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने नागरिकांना काही उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन केले असले, तरी ग्रामीण भागातील नागरिक त्याबाबत फारसे गंभीर नाहीत. परिणामी, ग्रामीण भागात या उपाययाेजनांचा फज्जा उडाला असून, नागरिकांचा हा बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर पडत असल्याने संक्रमण वाढत आहे. शिवाय, नागरिक लक्षणे आढळून आल्यानंतरही काेराेना टेस्ट करण्याकडे फारसे गांभीर्याने बघत नाही.

जिल्हा प्रशासनाने साथराेग प्रतिबंधक कायद्यान्वये जिल्ह्यातील आठवडाबाजारांवर बंदी घातली असताना आठवडाबाजार भरणे, त्यात भाजीपाला व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांसमाेर गर्दी करणे, घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क न वापरणे, कुठे स्पर्श करणे, हात सॅनिटाइझ न करणे किंवा साबणाने न धुणे, विनाकारण घराबाहेर पडणे, या बाबी सुरूच आहेत. काहींनी मास्क वापरायला सुरुवात केली. परंतु, त्यांचे मास्क नाक व ताेंड उघडे ठेवून हनुवटी झाकणारे ठरले.

आठवडाबाजारांसाेबत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखांमध्येही या काळात माेठी गर्दी दिसून आली. यात गुमथळा (ता. कामठी) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, वडाेदा (ता. कामठी) येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखांचा समावेश असून, या दाेन्ही शाखांमध्ये परिसरातील गावांमधील शेकडाे नागरिकांची खाती आहेत. खातेदारांनी या काळात ऑनलाइन आर्थिक व्यवहाराला महत्त्व देण्याऐवजी ऑफलाइन व्यवहाराला महत्त्व दिले. बँक शाखेत साधे उभे राहायला जागा नसतानाही नागरिकांनी स्वत:चा व इतरांचा जीव धाेक्यात टाकून त्यांचे व्यवहार करवून घेतले.

दरम्यान, या काळात नागरिकांचे त्यांच्या नातेवाइकांकडे दुसऱ्या गावी जाणे, तिथे मुक्काम करणे, लग्नकार्य अथवा अंत्यसंस्कारात सहभागी हाेणे, देवदर्शनाला जाणे हेही प्रकार सुरूच आहे. या सर्व बाबी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहीत असूनही, कुणीही याला ब्रेक लावण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परिणामी, प्रत्येक गावातील घराेघरी काेराेनाची लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत असून, कुणीही काेराेना टेस्ट करून स्वत:ची काळजी घेण्याची व प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याची तसदी घेत नाही.

...

सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांत गर्दी

शासनाने काेराेना संक्रमणकाळात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत २५ ते ५० नागरिकांना उपस्थित राहण्याची मुभा दिली. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांनी लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार, तेरावी, चाैदावी यासह भजन, कीर्तन या कार्यक्रमांना ५०० ते १,००० च्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमांमध्ये कुणीही मास्क वापरण्याची किंवा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची तसदी घेतली नाही. शेतीची कामे करण्यासाठी मजुरांची वाहनात दाटीदाटीने ने-आण करण्याचे प्रकार सुरूच राहिले.

...

सहा जणांचा मृत्यू

गुमथळा परिसरातील भूगाव (ता. कामठी) येथे काेराेनाचे संक्रमण थाेडे अधिक असल्याचे दिसून येते. येथे मागील काही दिवसांत एकापाठाेपाठ एक अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात माजी सरपंच पांडुरंग आंबिलडुके (५०), व्यावसायिक रोशन दुरूगकर (३२) यांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी त्यांच्याकडील लग्नसमारंभ स्थगित केले आहेत. असे असले तरी या भागात काेराेना लसीकरणाचा वेगही संथ आहे.

Web Title: Citizens' irresponsibility on Kareena's path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.