ध्वजारोहणासाठी जात असलेल्या सीआयएसएफ हवालदाराचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:48+5:302021-02-05T04:56:48+5:30
नागपूर : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी जात असलेल्या सीआयएसएफच्या हवालदाराचा अपघातात मृत्यू झाला. सोनेगाव एअरपोर्ट कॉलनी येथे घडलेल्या या घटनेमुळे ...

ध्वजारोहणासाठी जात असलेल्या सीआयएसएफ हवालदाराचा अपघातात मृत्यू
नागपूर : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी जात असलेल्या सीआयएसएफच्या हवालदाराचा अपघातात मृत्यू झाला. सोनेगाव एअरपोर्ट कॉलनी येथे घडलेल्या या घटनेमुळे सीआयएसएफचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शोक पसरला आहे.
गजेंद्रसिंह रघुवंशी असे मृत हवालदाराचे नाव आहे. ते सीआयएसएफमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात करण्यात आले होते. ते विमानतळ परिसरातील एअरपोर्ट कॉलनीमध्ये राहत होते. मंगळवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी सीआयएसएफ कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सकाळी ८ वाजता रघुवंशी घरून स्कूटरने (क्र. टी.एन. ६३ ए ०३४०) कार्यालयाकडे जात होते. घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या लक्ष्मी किराणा स्टोरजवळ दूध विक्रेता बाइकने (क्र. एम.एच. ३१ ई.जे. ७४९५) जात होता. बाइक चालकाने रघुवंशी यांच्या स्कूटरला धडक दिली. रघुवंशी स्कूटरसह खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. अपघाताची माहिती होताच त्यांची पत्नी व मुली घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी रघुवंशी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रघुवंशी हे मूळचे कारंजा, मंगरुळपीर, वाशिम येथील रहिवासी होते. कुटुंबात पत्नी गौरी, मोठी मुलगी डॉ. नेहा व लहान मुलगी निधी आहेत. निधी डेंटल कॉलेजची विद्यार्थिनी आहे. रघुवंशी यांना २००८ मध्ये उल्लेखनीय सेवेसाठी डीजी पदकाने सन्मानित करण्यात आले होते. ते सीआयएसएफमध्ये योगा प्रशिक्षकही होते. मुंगेर येथील योग विद्यापीठातून त्यांनी पदवीही मिळविली होती. पुढच्या महिन्यातच ते सेवानिवृत्त होणार होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच रघुवंशी यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांचे साथीदार अधिकारी व कर्मचारी यांच्यात शोक पसरला आहे. सोनेगाव पोलिसांनी रघुवंशी यांची मुलगी डॉ. नेहा यांच्या तक्रारीवरून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.