सिने गीतांची सुरेल मैफिल!
By Admin | Updated: September 9, 2014 01:15 IST2014-09-09T01:15:16+5:302014-09-09T01:15:16+5:30
शिक्षक हा समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. पण शिक्षकांकडे पाहण्याची दृष्टी मात्र शिक्षण देणारा अशीच असते. ते खरे असले तरी अनेक शिक्षकांमध्ये एक कलावंतही दडला असतो.

सिने गीतांची सुरेल मैफिल!
नागपूर : शिक्षक हा समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. पण शिक्षकांकडे पाहण्याची दृष्टी मात्र शिक्षण देणारा अशीच असते. ते खरे असले तरी अनेक शिक्षकांमध्ये एक कलावंतही दडला असतो. पण विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या पेशात त्यांच्यातला कलावंत दुर्लक्षित राहतो. पण विविध महाविद्यालयात अभियांत्रिकी, सायबर लॉ, कला, विज्ञान, वाणिज्य शिकविणाऱ्या शिक्षकांनी आज सुरेल गीते सादर करून त्यांच्यातील गानप्रतिभेचा परिचय दिला. या प्राध्यापकांची गीते ऐकताना आपण प्रथितयश गायक कलावंतांचीच गीते ऐकतो आहोत, असा अनुभव आज रसिकांनी घेतला.
हार्मोनी इव्हेन्ट्सतर्फे शिक्षक दिनाच्या औचित्याने डॉ. देशपांडे सभागृहात ‘गुरुसाक्षात स्वरब्रह्म’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना राजेश समर्थ यांची होती. कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील डॉ. अविनाश श्रीखंडे, डॉ. नरेन्द्र कान्हे, डॉ. किशोर भोयर, डॉ. यासिन शेख, प्रा. संदीप तम्मेवार, डॉ. रिना साहा, प्रा. वैशाली उपाध्याय, प्रा. अहिंसा तिरपुडे यांनी गीतांच्या सादरीकरणाने रंगत आणली. कार्यक्रमाचा प्रारंभ अहिंसा तिरपुडेने ‘आईये मेहरबा..आणि पिया तो से नैना लागे रे...’ या गीताने केला. यासिन शेख यांनी मुकेशच्या आवाजातील ‘एक दिन बिक जायेगा...आणि जाने कहाँ गये वो दिन...’ ही गीते खास मुकेश स्टाईलने सादर करून उपस्थितांची दाद घेतली. नरेंद्र कान्हे यांनी ‘मेरे मितवा..., और इस दिल मे क्या रखा है...’ हे गीत सादर केले. रिना साहा यांनी ‘आगे भी जाने ना तू...., जाईये आप कहाँ...’ या गीताने कार्यक्रमाला रंग भरला. यावेळी सर्वच गायकांनी तयारीने सादरीकरण करताना ‘मुसाफिर हू यारो, ओ हंसिनी, आज से पहले, अजी ऐसा मौका फिर कहा मिलेगा..., तेरे मस्त मस्त दो नैन, दिल की नजर से’ आदी गीते सादर केली.
वैशाली उपाध्ये आणि अहिंसा यांच्या गीतांना वन्समोअरची मागणी झाली. वैशाली उपाध्ये यांनी सादर केलेल्या ‘पिया बावरी आणि लग जा गले....’ या गीतांना रसिकांनी विशेष दाद दिली. (प्रतिनिधी)