सिगारेटचा मोह नडला.. अन् तब्बल अडीच लाखांना गंडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 18:57 IST2022-06-02T18:57:20+5:302022-06-02T18:57:59+5:30
Nagpur News मध्यरात्रीनंतर घरी परतत असताना सिगारेट पिण्याच्या मोह एका व्यक्तीला अडीच लाखांचा फटका लावून गेला.

सिगारेटचा मोह नडला.. अन् तब्बल अडीच लाखांना गंडला
नागपूर : मध्यरात्रीनंतर घरी परतत असताना सिगारेट पिण्याच्या मोह एका व्यक्तीला अडीच लाखांचा फटका लावून गेला. अज्ञात चोराने दुचाकीच्या डिक्कीतून रोख रक्कम व दागिने चोरी केले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रफुल्ल हेमराज बोकडे (३९, नाईक तलाव) हे आपल्या मित्राच्या वाढदिवसाला नंदनवन येथील एका हॉटेलात गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना त्यांच्यासोबत आणखी एक मित्र महेश हा देखील होता. रात्रीची वेळ असल्याने प्रफुल्लने गळ्यातील सोन्याची चेन व ब्रेसलेट डिक्कीत काढून ठेवले. त्यांना सिगारेटची तलब आली. रस्त्यात त्यांनी २५ ते ३० वयोगटातील तीन तरुणांना पानठेला कुठे उघडा असेल अशी विचारणा केली. तरुणांनी सांगितल्यानुसार बालाजी मंदिर रोड येथे त्यांनी आपली दुचाकी उभी केली व बाजूच्या गल्लीत पानठेला शोधण्यासाठी गेले. परंतु त्या गल्लीत पानठेलाच नव्हता. त्यामुळे दोघेही परत दुचाकीजवळ आले. तेव्हा दुचाकीची डिक्की उघडी असल्याचे दिसून आले. त्यातील ८ हजार रोख व दागिने असा एकूण २ लाख ४८ हजारांचा माल गायब होता. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलीस तपास करत आहेत.