जुन्या नोटांच्या बदल्यात दिल्या खेळण्यातल्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:15 IST2018-11-03T23:12:42+5:302018-11-03T23:15:08+5:30
जुन्या नोटांच्या बदल्यात कोऱ्या करकरीत नोटा देतो, अशी बतावणी करून एका व्यावसायिकाला १० हजारांचा गंडा घालणाऱ्या दोघांना जरीपटका पोलिसांनी अटक केली.

जुन्या नोटांच्या बदल्यात दिल्या खेळण्यातल्या नोटा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या नोटांच्या बदल्यात कोऱ्या करकरीत नोटा देतो, अशी बतावणी करून एका व्यावसायिकाला १० हजारांचा गंडा घालणाऱ्या दोघांना जरीपटका पोलिसांनी अटक केली. राजेंद्र भय्यालाल नशिने आणि हेमंत भक्ते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मध्यप्रदेशातील रामाकोना येथील रहिवासी आहेत.
मनोज दशरथ जरेले (वय ३५) हे जरीपटक्यातील कुशीनगरात राहतात. ते विटाभट्टी व्यावसायिक आहेत. आरोपी नशिने याने जरेले यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आपली आरबीआय मध्ये सेटिंग असून, जुन्या नोटांच्या बदल्यात कोºया करकरीत नोटा मिळवून देऊ शकतो, असे आरोपी म्हणाला. जरेलेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला जुन्या नोटा देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार, नशिने त्याचा साथीदार भक्तेला घेऊन शुक्रवारी दुपारी १.१५ च्या सुमारास लाल गोदामाजवळ पोहचला. पहिली भेट असल्यामुळे सॅम्पल म्हणून जरेलेने ५०० रुपयांच्या २० नोटा नशिने आणि त्याच्या साथीदाराला दिल्या. त्याबदल्यात आरोपीने १०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल जरेलेंना दिले. हे २० हजार रुपये आहे, आणखी नोटा बदलवायच्या असेल तर सीताबर्डीत भेट, असे सांगितले. आरोपी निघून गेल्यानंतर जरेलेंनी १०० च्या नोटांचे बंडल मोजण्यासाठी काढण्यासाठी आले असता वर एक १०० ची नोट आणि आतमध्ये मुलांच्या खेळण्याच्या नोटा (चिल्ड्रेन मनोरंजन बँक) असल्याचे त्यांना दिसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने जरेलेंनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते सीताबर्डीत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, जरेलेंनी आरोपींना चलनातून बाद झालेल्या नोटा दिल्या की जीर्ण झालेल्या नोटा दिल्या, त्याबाबत पोलिसांकडून रात्रीपर्यंत विसंगत माहिती मिळत होती.
लॉजमधून अटक, नोटाही जप्त
पोलिसांनी सीताबर्डीच्या अपना लॉजमध्ये आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीच्या बॅगची तपासणी केली असता त्यांच्याकडे ९७ हजारांच्या नोटा आढळल्या. खेळण्याच्या नोटांचे काही बंडलही पोलिसांना आढळले. पोलिसांनी ते जप्त करून त्यांना अटक केली. आरोपींकडे ९७ हजार आढळल्यामुळे त्यांनी जरेलेंप्रमाणचे पुन्हा काही जणांची फसवणूक केली असावी, असा संशय आहे. ते शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपींचा ६ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळवला असून, पुढील तपास सुरू आहे.