हत्तीरोग निर्मूलनासाठी होणार बालकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:16+5:302021-09-25T04:09:16+5:30
नागपूर : हत्तीरोगामुळे (लिम्फॅटिक फायलेरिया) शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. रोग झाल्यावर कुठलेच औषध नाही. यामुळे ...

हत्तीरोग निर्मूलनासाठी होणार बालकांची तपासणी
नागपूर : हत्तीरोगामुळे (लिम्फॅटिक फायलेरिया) शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. रोग झाल्यावर कुठलेच औषध नाही. यामुळे नागपूर शहरातील हत्तीरोगाचे प्रमाण पाहण्यासाठी शासनाच्या वतीने ६ ते ७ वयोगटातील मुलांची रक्त तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, १० मिनिटातच त्याचा अहवाल मिळणार आहे.
जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी २००४ पासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए) राबविली जात आहे. यामुळे हत्तीरोग रुग्णांची संख्या कमी होऊन, मागील तीन वर्षांत लोकसंख्येच्या १ टक्क्यापेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. सध्या ‘आयडीए’ या तिहेरी उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे हत्तीरोगाचे मूल्यमापन झाले नाही. यामुळे २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘संक्रमण पडताळणी सर्वेक्षण’ (टीएएस) राबविले जात आहे. यात ६ ते ७ वर्षांच्या मुलाचे रक्त ‘फायलेरिया टेस्ट स्ट्रिप’द्वारे तपासण्यात येणार आहे. १० मिनिटातच तो दूषित आहे किंवा नाही, हे कळणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संस्थेकडून आठ हजार किट्स नागपूर जिल्ह्याकरिता उपलब्ध झाल्या आहेत. या मोहिमेसाठी शहर व ग्रामीणचे प्रत्येकी दोन विभाग करण्यात आले आहे. ३० चमूद्वारे ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक चमूमध्ये सात ते आठ कर्मचारी असतील, अशी माहिती फायलेरिया अधिकारी मोनिका चारमोडे यांनी दिली.
- शहर आणि ग्रामीणमधील ६,८०० मुलांची होणार तपासणी
चारमोडे यांनी सांगितले, शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी ३ हजार ४०० असे एकूण ६ हजार ८०० मुलांची या मोहिमेंतर्गत तपासणी केली जाणार आहे. मुलांच्या रक्त तपासणीच्या निष्कर्षावरून संबंधित क्षेत्रामध्ये जंतूचे संक्रमण अजूनही सुरू आहे किंवा नाही, याची अचूक माहिती मिळणार आहे. त्यानुसार भविष्यात हत्तीरोग औषधोपचार मोहीम राबवायची किंवा नाही, हे ठरविता येणार आहे.