बालक तस्करीचे धागे सरोगसी रॅकेटशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:59+5:302020-12-04T04:25:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मुले विकणाऱ्या टोळीचे धागे सरोगसी मदर रॅकेटमध्ये गुंतले आहेत. तशा प्रकारची ठोस माहिती पोलीस ...

बालक तस्करीचे धागे सरोगसी रॅकेटशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मुले विकणाऱ्या टोळीचे धागे सरोगसी मदर रॅकेटमध्ये गुंतले आहेत. तशा प्रकारची ठोस माहिती पोलीस तपासात पुढे आली असल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याचे संकेत मिळाले आहे. अडीच वर्षांपूर्वी लोकमतने उपराजधानीत चालणाऱ्या सरोगसी मदर रॅकेटचा भंडाफोड करून खळबळ उडवून दिली होती, हे विशेष.
कधी दुसऱ्यांची मुले चोरून विकायची तर कधी स्वताचे गर्भाशय भाड्याने देऊन जन्माला घातलेले मूल विकायचे, अशी कार्यपद्धत असलेल्या टोळीचा अत्यंत शिताफीने छडा लावला. सिनेस्टाईल पद्धतीने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या टोळीशी संपर्क साधला आणि मुलगी विकत पाहिजे असे सांगून त्यांच्याशी अडीच लाखात सौदा केला. त्यानंतर जबलपूरच्या एका निराधार व्यक्तीची मुलगी या टोळीतील सदस्य घेऊन आले. रोकड घेऊन ती मुलगी बनावट ग्राहकाच्या रुपात आलेल्या पोलिसांना दिसताच पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. यात आतापावेतो सहा महिला आणि पुरुषांना अटक करण्यात आली. या टोळीने आतापर्यंतच्या चौकशीत अनेक खुलासे केले असून अटकेतील एक महिला सरोगसी मदर म्हणून अडीच वर्षांपूर्वी पीडित म्हणून पुढे आली होती. २८ जुलै २०१८ ला लोकमतने सरोगसी मदर्स रॅकेटचा छडा लावून राज्यभर खळबळ उडवून दिली होती. तत्कालीन पोलीस उपायुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी त्यावेळी शहरातील चार बड्या डॉक्टरांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलांना दिलेल्या वचनानुसार १४ लाख रुपये न देता त्यांची फसवणूक केल्याचा ठपका यावेळी पोलिसांनी २८ जुलै २०१८ ला नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात ठेवला होता. मात्र, प्रचंड दडपण आल्याने या प्रकरणाचा तपास नंतर थंडबस्त्यात पडला. आता मुले विकण्याच्या आरोपात पकडलेल्या आरोपी महिला त्यावेळी पीडित होत्या, असे तपासात उघड झाल्याने या टोळीचे त्या रॅकेटमध्ये धागे गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास नव्या वळणावर जाण्याचे संकेत असून पोलीस आता कशा पद्धतीने तपास करतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी आरोपी वाढणार
या प्रकरणात आरोपींकडून आणखी काही जणांची नावे घेण्यात आली आहे. त्याची शहानिशा पोलीस करीत आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि तपास अधिकारी तृप्ती सोनवणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी गुन्हे शाखेच्या काही चमू बाहेरगावी गेल्याचेही त्यांनी सांगितले.