उपराजधानीत बालमजुरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय; बारा-चौदा वर्षांच्या मुलांची तस्करी
By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2025 00:04 IST2025-01-15T00:04:01+5:302025-01-15T00:04:16+5:30
परप्रांतिय बालकांना राबविले जात आहे नागपुरात

उपराजधानीत बालमजुरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय; बारा-चौदा वर्षांच्या मुलांची तस्करी
नरेश डोंगरे
नागपूर : बारा-चवदा वर्षांच्या मुलांना चांगल्या शिक्षण, रोजगाराचे आमिष दाखवून, फूस लावून नागपुरात आणले जाते. येथे त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी कबाडकष्ट करवून घेतले जाते आणि कोंडवाड्यात ठेवावे, तसे लहानशा खोलीत ठेवले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दलालांच्या रॅकेटकडून गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
गेल्या काही वर्षांत सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नागपूरचे नाव सर्वत्र चर्चेला आले आहे. येथे मोठ्या प्रमाणात रस्ते, पुल, ईमारतींची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. त्यामुळे नागपुरात परप्रांतिय मजुरांचे दर आठवड्याला लोंढे दाखल होतात. अन्य प्रांताच्या तुलनेत त्यांना येथे चांगली मजुरी मिळते. बांधकामस्थळी काम करणाऱ्या पुरूषाला पाचशे ते सहाशे रुपये तर महिलेला चारशे ते पाचशे रुपये मोबदला मिळतो. त्यामुळे नागपुरात परप्रांतिय मजुरांसोबतच 'मोकाद्दम, मेटकरी' (मजूर आणि काम करवून घेणारांच्या मधला दलाल)ही तयार होत आहे. ही मंडळी ठिकठिकाणी मजूर पुरवितात. त्यांचा रोजची मजुरी किती द्यायची, हेदेखिल तेच ठरवितात. त्यातून प्रत्येक मजुरांवर त्यांना कमिशनच्या रुपात मोठी रक्कम मिळते. त्यामुळे ते त्या मजुरांच्या छोट्या छोट्या मुलांनाही कामावर जुंपतात. त्यांना मजुरीही कमी द्यावी लागते आणि धाकदपट करून जास्त वेळ कामही करवून घेता येते. हे लक्षात आले म्हणून की काय, अनेक दलालांनी एक रॅकेट तयार करून परप्रांतिय अल्पवयीन मुलांना नागपुरात आणून कामाला जुंपण्याचे तंत्र अंगिकारले आहे.
यूपी, बिहारमधील बालकांची तस्करी
सूत्रांच्या माहितीनुसार, छत्तीसगड, एमपी, यूपी, बिहार, झारखंड, प. बंगाल, ओडिशासह ठिकठिकाणच्या बालकांना आणि त्यांच्या पालकांना हे रॅकेट फूस लावतात. मुलाला मोफत शिक्षण, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवितात. त्यामुळे गरिब पालकही आपल्या काजळाच्या तुकड्यांना या दलालांच्या हवाली करतात.
कंपन्यात काम, कोंडवाड्यासारखी व्यवस्था
फूस लावून १२ ते १८ वयोगटातील मुलांना नागपुरात आणल्यानंतर हे दलाल त्यांना वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या कंपन्यां-कारखान्यात कामाला जुंपतात. त्यांच्याकडून भल्या सकाळपासून रात्रीउशिरापर्यंत काम करवून घेतले जाते. अविकसित भागात, खास करून झोपडपट्ट्यांमधील एखाद्या खोलीत ८ ते १० बालकांना येथे डांबल्यासारखे ठेवले जाते. जेवणासाठी दाल-चावल दिले जाते.