बालमजुरांच्या तस्करीचे रॅकेट सक्रिय, मुलांना, पालकांना केले जाते ईमोशनल ब्लॅकमेल
By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2025 21:37 IST2025-01-15T21:37:39+5:302025-01-15T21:37:58+5:30
- ओळखीच्या व्यक्तींकडूनच विश्वासघात : ‘काका’ असल्याची बतावणी करून बनवितात ‘मामा’

बालमजुरांच्या तस्करीचे रॅकेट सक्रिय, मुलांना, पालकांना केले जाते ईमोशनल ब्लॅकमेल
नागपूर : परप्रांतीय अल्पवयीन मुलांच्या तस्करीत सक्रिय असलेले मोकादम, मेटकरी आणि त्यांच्या दलालाचे रॅकेट पैशाच्या नादात ओळखीच्याच व्यक्तींचा विश्वासघात करीत असल्याचे धक्कादायक वास्तव चाैकशीतून पुढे आले आहे. हे भामटे मुलांची तस्करी करताना दुसऱ्यांना ‘काका’ असल्याची बतावणी करून ‘मामा’ बनवित असल्याचेही सांगितले जाते.
सूत्रांकडून या रॅकेटची मोडस् ऑपरेंडी कळाली. त्यानुसार, आपल्या परिचयातील किंवा सोबतच्या मजुराच्या ओळखीच्या गरीब पालकांवर या रॅकेटमधील दलाल जाळे टाकतात. त्यांच्याशी संपर्क साधून ‘इथे तुम्ही गरिबीत जगता, आता मुलांनाही गरिबीतच जगविणार का?’ असा भावनिक सवाल करतात. त्यांना मुलांच्या चांगल्या भवितव्याचे स्वप्न दाखवितात. त्यांना अशा प्रकारे ईमोशनल ब्लॅकमेल केल्यानंतर घरच्या आणि आजूबाजूच्या अशा एकसाथ पाच-दहा बालकांना हे दलाल नागपुरात घेऊन येतात.
त्यांच्या गावापासून तो नागपुरात येईपर्यंत मार्गात कुणी मुलांबद्दल विचारणा केल्यास हे दलाल स्वत:ला कधी त्या मुलांचे काका तर कधी मामा सांगतात. त्या मुलांनाही दुसऱ्यांना असेच सांगण्यास बाध्य केले जाते.
कमाईवर काका, मामाचा डल्ला
येथे आणल्यानंतर ज्या कामाच्या ठिकाणी मजुरांची मागणी आहे, अशा ठिकाणी या मुलांना कामावर जुंपले जाते. त्यांच्या मजुरीच्या बदल्यात त्यांना दोन वेळेचे जेवण आणि किरकोळ पैसे दिले जातात. या बालमजुरांच्या घामाच्या, त्यांच्या हक्काच्या कमाईवर कथित आरोपी काका, मामा डल्ला मारतात. ही रक्कम ते स्वत:जवळ ठेवून घेतात. पहिल्या एक-दोन महिन्यांत त्यातील १० ते २० टक्के रक्कम मुलांच्या पालकांना त्यांच्या गावी पाठवून त्यांनाही खूश ठेवले जाते.
नागपूर, विदर्भात मोठ्या प्रमाणावर बालमजूर
सूत्रांच्या मते आजघडीला नागपुरात विविध प्रांतातील शंभरावर आणि विदर्भातही मोठ्या प्रमाणावर बालमजूर कार्यरत आहेत. शहराच्या टोकांवर असलेल्या पारडी, खसाळा, माजरी, शांतीनगर, यशोधरानगर, कळमना, लकडगंज, हिंगणा, एमआयडीसी, बुटीबोरीसह अन्य काही भागात गुपचूप सुरू असलेल्या काही छोट्यामोठ्या कंपन्या, कारखाने, हॉटेल आणि अशाच प्रकारच्या काही आस्थापनांत त्यांना कामावर जुंपण्यात आल्याचीही माहिती आहे.