नागपुरातील चिमुकल्याचा अपहरणकर्ता इंदूरमध्ये जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 23:32 IST2020-09-15T23:31:16+5:302020-09-15T23:32:27+5:30
तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेल्या एका गुन्हेगाराला इंदूर (मध्य प्रदेश) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून बालकाचीही सुखरूप सुटका केली.

नागपुरातील चिमुकल्याचा अपहरणकर्ता इंदूरमध्ये जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याला नेपाळला नेण्याच्या तयारीत असलेल्या एका गुन्हेगाराला इंदूर (मध्य प्रदेश) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून बालकाचीही सुखरूप सुटका केली.
फारुख ऊर्फ बम्बईया इब्राहिम खान (५५) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा नेपाळच्या विराटनगर, भूमी प्रशासन चौक, तिंगतौलिया येथील रहिवासी आहे.
आरोपी फारुखने ताजबागमधील फूटपाथवर राहणाऱ्या फिरदोस फातिमा शब्बीर खान नामक महिलेच्या तीन वर्षीय चिमुकला अदनान समीर याला पतंग घेऊन देतो, असे म्हणून सोमवारी सकाळी आठ वाजता उचलून नेले. दुपार झाली तरी तो परतला नाही. त्यामुळे महिलेने आजूबाजूच्यांना ही माहिती दिली. त्यानंतर सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार सत्यवान माने यांनी आपल्या वरिष्ठांना ही माहिती कळवून आरोपींच्या शोधासाठी पथके कामी लावली. दरम्यान, आरोपी मध्य प्रदेशातील इंदूरकडे गेल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक वरिष्ठांनी इंदूरचे डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र यांना माहिती कळविली. त्यांनी इंदूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके सक्रिय करून नागपूर-इंदूर मार्गावरील वाहनांवर नजर रोखली. एका व्होल्वो बसमध्ये आरोपी फारुखला चिमुकल्या समीरसह बसून दिसताच पोलिसांनी मंगळवारी त्याला ताब्यात घेतले.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी फारुख चिमुकल्या अदनानला घेऊन मंगळवारी सायंकाळी इंदूरहून दिल्लीला बसने जाणार होता. त्याने त्याचे तिकीटही बुक केले होते. दिल्लीहून नेपाळला पळून जाण्याचा फारूखचा कट होता. मात्र नागपूर आणि इंदूर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवल्यामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला आणि चिमुकला अदनानही सुखरूप राहिला.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीकडून पोलिसांनी बसचे तिकीट तसेच पंधरा हजार रुपये जप्त केले.
नागपूर पोलीस रवाना
आरोपी फारुखला पकडल्याची आणि त्याच्या ताब्यातील चिमुकला अदनान सुखरूप असल्याची बातमी कळताच नागपूर पोलिसांचे एक पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी इंदूरकडे रवाना झाले. बुधवारी आरोपी तसेच चिमुकल्याला घेऊन हे पथक नागपुरात पोहोचणार आहे.
आरोपी फारुख मूळचा नेपाळ येथील रहिवासी असून काही वर्षे तो मुंबईत होता. तर त्यानंतर ठाणे, पुणे, औरंगाबाद इथून तो नागपुरात आला. काही महिन्यांपासून तो हॉटेल कोहिनूरमध्ये काम करायचा, अशी माहिती पुढे आली आहे. छोट्या मुलांचे अपहरण करून त्यांना विकणाऱ्या टोळीचा हा सदस्य असावा, अशीही शंका आहे. त्याला अटक केल्यानंतर पुढील प्रकार तपासात स्पष्ट होईल, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.