चिखली प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’

By Admin | Updated: April 28, 2016 03:03 IST2016-04-28T03:03:55+5:302016-04-28T03:03:55+5:30

चिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी ....

Chikhali project 'fail' in irrigation | चिखली प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’

चिखली प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’

११०० एकरात पोहोचले नाही पाणी : ४३ कोटींचा खर्च पाण्यात
ंंविजय कडू काटोल
चिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी असताना केवळ ७०० एकरातच प्रकल्पाचे पाणी पोहोचले. परिणामी हा प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’ झाल्याचे वास्तवचित्र असून शेतकऱ्यांमध्ये मात्र कमालीचा संताप आहे.
चिखली नाला प्रकल्पाला १९९३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाद्वारे चिखली, येनवा, मोहखेडी, कलंभा, येरला (धोटे), वंडली (सावरकर) अशा सहा गावांच्या परिसरातील १८०० एकरमध्ये सिंचन होणे अपेक्षित होते. परंतु कालव्याची कामे पूर्ण करण्यात न आल्याने आजमितीस केवळ ७०० एकर ओलीत होत आहे. या प्रकल्पाच्या अपूर्ण कालव्याचा फटका वंडली, मसलीसह इतर गावांना बसला आहे. या प्रकल्पाची लांबी १५९२ मीटर आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रकल्प पूर्ण भरतो. मात्र हिवाळ्यानंतर ओलितासाठी नियोजन नसल्याने या प्रकल्पातील पाण्याचा पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
चिखली प्रकल्पातील पाणी केवळ सिंचनासाठी अपेक्षित होते. मात्र नरखेडसह सावरगाव येथे पाणीटंचाई असल्याने विशेष बाब म्हणून १५ वर्षांपूर्वी या धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले. चिखली ते नरखेड हे अंतर २२ किमी असून सद्यस्थितीत येथूनच नरखेडला पाणीपुरवठा होत आहे. पाईपलाईनमुळे पाणी वितरणात अनेक अडचणी निर्माण होतात. दुसरीकडे, नरखेडपासून अवघ्या पाच किमी अंतरावर पिंपळगाव (वखाजी) येथे धरण बांधण्यात आले. त्या धरणापर्यंत जुनी पाईपलाईन आहे. चिखली धरणाऐवजी त्या धरणावरून नरखेडला पाणीपुरवठा केल्यास पाणी वितरणाचा खर्च बऱ्याच अंशी कमी होईल. सोबतच चिखली प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळून सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होईल. परंतु त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही.

प्रकल्पाचा फायदा काय?
प्रकल्पाचा आराखडा तयार करताना रेल्वे मार्ग पार करून कालवा न्यायचा आहे, हे माहिती होते. असे असताना त्याचा विचार न करता काम सुरू झाले. मात्र त्यानंतर रेल्वे क्रॉसिंगपुढे साडेनऊ किमी अंतराच्या कालव्याचे कामच पूर्ण झाले नाही. त्यामुळे आजही १८०० पैकी ११०० एकर जमीन सिंचनापासून वंचित आहे. धरण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना ओलितासाठीच पाणी मिळत नसेल तर या धरणाचा फायदा काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली जात आहे.
कालव्याच्या कामात अडथळा
बुडीत क्षेत्रात येणाऱ्या इसापूरचे पुनर्वसन करून तेथे धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र मुख्य कालव्याचे काम करताना या कामात काटोल-नरखेड रेल्वे मार्ग येत असल्याने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत काम करण्यात ठरले. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे भिष्णूरपर्यंत या धरणाचे पाणी पोहोचविण्यासाठी लघु मध्यम प्रकल्प विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे निधीची मागणी केली. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे कालवा नेण्यासाठी रेल्वे विभागाकडे दोन कोटी रुपये भरायचे आहे. त्याची मागणी केली असता मध्यम प्रकल्प विभागाने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत कालव्याचे काम का पूर्ण झाले नाही, अशी विचारणा केली हे विशेष!

Web Title: Chikhali project 'fail' in irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.