गुंडांशी लढणाऱ्या आम आदमीला मुख्यमंत्र्यांनी दिला अंगरक्षक
By Admin | Updated: July 1, 2014 00:58 IST2014-07-01T00:58:15+5:302014-07-01T00:58:15+5:30
पुलगाव पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कडवा विरोध करणाऱ्या एका पानटपरीचालकास थेट मुख्यमंत्र्यांनी पोलीस संरक्षण दिले आहे. पानटपरीचालकास मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने

गुंडांशी लढणाऱ्या आम आदमीला मुख्यमंत्र्यांनी दिला अंगरक्षक
पुलगाव ऩप़ जागेवर अवैध बांधकाम प्रकरण : आरोपींना पोलीस व न.प. प्रशासनाकडून अभय
राजेश भोजेकर - वर्धा
पुलगाव पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कडवा विरोध करणाऱ्या एका पानटपरीचालकास थेट मुख्यमंत्र्यांनी पोलीस संरक्षण दिले आहे. पानटपरीचालकास मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अंगरक्षक मिळाल्याची महाराष्ट्रातील ही कदाचित पहिलीच घटना असावी़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या या कारवाईने अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यांना बळ मिळणार असल्याची भावना पानटपरीचालक दुर्गाशंकर शितलसहाय वाजपेयी याने व्यक्त केली़
पुलगावला वॉर्ड क्ऱ ४ बरांडा येथे राहणारा दुर्गाशंकर अनेक वर्षांपासून सीएडी कॅम्प रोड मार्गावरील डायमंड लॉजपुढे पानठेला चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता़ पानठेला असलेल्या परिसरातील ऩप़च्या जागेवर जुगलकिशोर शुक्ला यांनी अवैधरीत्या हॉटेल बांधकाम केले़ त्याची तक्रार त्याने पोलिसात केली़ त्यामुळे दुर्गाशंकरला मारहाण झाली़ शिवीगाळही झाली़ जुगलकिशोर यांनी एक-दीड वर्षांी ते हॉटेल भागवतीप्रसाद तिवारी यांना जागेसह विकले़ त्यानंतर तिवारी यांनी दुर्गाशंकरच्या मागे पानठेला हटविण्यासाठी तगादा लावला़ त्याला धमक्या देणे सुरू झाले. दरम्यान, दुर्गाशंकरला तब्बल १३ वेळा मारहाण करण्यात आली. प्रत्येक वेळी त्याने पुलगाव पोलिसांना रितसर तक्रार दिली़ मात्र एकदाही कारवाई झाली नाही़ लोकशाही दिनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली़ नंतर विभागीय आयुक्तांकडेही तक्रार केली़ उपयोग न झाल्याने अखेर थेट मुंबई गाठून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत आपबिती सांगितली़ मुख्यमंत्र्यांनी त्याची तक्रार गांभीर्याने घेतली़ इतकेच नव्हे, तर सचिवामार्फत पोलीस महासंचालकांना आदेश देत दुर्गाशंकर यांना पोलीस संरक्षण द्यावे व याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या़ तरीही कोणतीच कारवाई झाली नाही. ही बाब त्याने पुन्हा मुख्यमंत्र्यांना कळविल्यानंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अंगरक्षक दिला़
संबंधितांवर मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही़ या प्रकरणात पोलीस प्रशासनासह नगर पालिकेची यंत्रणाही गुंतली असल्यामुळे कारवाईस धजावत नसल्याचा आरोप पीडित दुर्गाशंकर वाजपेयी यांनी केला आहे.