गडचिरोलीचे 'पालक' होणार फडणवीसच! चंद्रशेखर बावनकुळे घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 06:53 IST2024-12-26T06:53:37+5:302024-12-26T06:53:54+5:30
स्वतःच दिले संकेत

गडचिरोलीचे 'पालक' होणार फडणवीसच! चंद्रशेखर बावनकुळे घेणार निर्णय
नागपूर : पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याचे संकेत दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून पालकमंत्रिपदाचा निर्णय घेतील. परवानगी मिळाल्यास गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे आहे, असे फडणवीस बुधवारी प्रेस क्लब येथे झालेल्या 'मीट द प्रेस' कार्यक्रमात म्हणाले. गडचिरोली हे देशातील पुढचे पोलादी शहर बनेल. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरलाही त्याचा फायदा होईल, एवढी खनिजे येथे आहेत. विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी सरकारने 'इको सिस्टीम' तयार केली आहे. सर्व मंत्र्यांना १०० दिवसांचा कामाचा आराखडा देण्यात आला असून, त्यानंतर याचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली
घटनेनंतर पर्यटन होऊ नये
परभणी आणि बीडमध्ये गेलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने जावे; पण कोणत्याही घटनेनंतर पर्यटन म्हणून जाणे योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.
त्यांच्या विनंतीवरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडला भेट दिल्याचे ते म्हणाले. गुन्हेगारांना कोणत्याही किमतीत सोडले जाणार नाही, याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
'आरक्षण हा मजा घेण्याचा प्रश्न नाही'
आता मजा येईल, असे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी केले आहे.
यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण हा सार्वजनिक विषय आहे. यात गमतीचा प्रश्नच नाही.
फडणवीस म्हणाले....
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केल्याबद्दल व गृहमंत्र्यांच्या व्हिडीओचा विपर्यास केल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी.
होर्डिंग्जबाबत न्यायालयाच्या सूचनांचे पालन करावे. कार्यकर्त्यांनी अवैध होर्डिंग लावू नये.
मोठ्या पाठबळामुळे जबाबदारी वाढली आहे. सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल.
राजकारण हे सेवेचे माध्यम
२०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र, संपूर्ण राज्याला न्याय दिला. आता अनुभवही आहे. शासन सकारात्मक निर्णय घेईल. चूक झाली तर तीही दुरुस्त केली जाईल. राजकारण हे माझ्यासाठी सेवेचे माध्यम असल्याचे फडणवीस म्हणाले.