नागपुरात एअर लाईनमध्ये नोकरीच्या नावावर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 10:35 IST2019-05-13T10:35:01+5:302019-05-13T10:35:34+5:30
विमान कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एका युवकाची फसवणूक केली. प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात एअर लाईनमध्ये नोकरीच्या नावावर फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमान कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांनी एका युवकाची फसवणूक केली. प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. श्वेता आणि नेहा सिंग असे आरोपी महिलांची नावे आहे. तर अमोल शशिकांत हस्तक रा. रामकृष्णनगर खामला, असे पीडित युवकाचे नाव आहे. अमोलचे वडील मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. अमोल एका खासगी कंपनीत एच.आर. मॅनेजर आहे.
अमोलच्या तक्रारीनुसार त्याने चांगल्या नोकरीच्या उद्देशाने आॅनलाईन जॉब प्लेसमेंट साईटवर आपला बायोडाटा अपलोड केला होता. या आधारावर ६ मे रोजी त्याला कथित श्वेता नावाच्या तरुणीचा फोन आला. तिने दिल्ली येथील फ्युचर जॉब सोल्युशन लि. कंपनीतून बोलत असल्याचे सांगत अमोलला नागपुरातीलच एअरलाईन्स कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. श्वेताने त्याला तीन कंपन्यांची नावे सुचविली. अमोलने इंडिगोमध्ये नोकरीची इच्छा व्यक्त केली. श्वेताने आॅप्टीट्यूड टेस्ट पास करण्याची अट सांगत अमोलला या टेस्टची लिंक पाठवली. श्वेताच्या सांगण्याुसार अमोलने विकास राजपूत नावाच्या व्यक्तीच्या खात्यात १५०० रुपये जमा केले. ७ मे रोजी दुपारी इंडिगोची कथित एच.आर. मॅनेजर नेहा सिंगने अमोलची टेलिफोनिक मुलाखत घेतली. अर्धा तास चाललेल्या या मुलाखतीनंतर नेहाने अमोलचे श्वेतासोबत बोलणे करून दिले. श्वेताने त्याला इंटरव्ह्यूत पास झाल्याचे सांगत दस्तावेज तपासण्याच्या नावावर ६,८०० रुपये जमा करण्यास सांगितले. अमोलने श्वेताच्या सांगण्यानुसार ही रक्कम ट्रान्सफर केली. यानंतर इंटरनेटवर ‘आॅफर लेटर’ उघडण्यासाठी पासवर्ड सांगण्याच्या बहाण्याने १५,८०० रुपये जमा करायला लावले. यानंतर अमोलला इंडिगोच्या नागपूर कार्यालयात ४५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्याला प्रशिक्षणासाठी २६,८०० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. प्रशिक्षण संपल्यावर ही रक्कम परत मिळेल, असे सांगितले. प्रशिक्षणाची रक्कमही जमा केल्यानंतर १३ मे रोजी नागपूरच्या विमा बाँडवर त्याची स्वाक्षरी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. यापूर्वी त्याला २८,६०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. सातत्याने पैसे जमा करण्यास सांगण्यात येत असल्याने अमोलला संशय आला. त्याने रुपये जमा करण्यास नकार दिला. यामुळे कथित श्वेताने कारवाई करण्याचा इशारा देत फोन कट केला. यानंतर अमोलने इंडिगोच्या टोल फ्री नंबवर संपर्क साधला. तिथे त्याला श्वेता किंवा नेहा सिंग नावाची कुठलीही कर्मचारी नसल्याचे माहीत पडले. त्याचप्रकारे नियुक्तीसाठी इंडिगोतर्फे कुठल्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नसल्याचे समजले. यानंतर अमोलने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एपीआय शिवचरण पेठे यांनी प्रकरणाचा तपास केला. या आधारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.