‘न्यूड डान्स’ प्रकरण; एलेक्स डान्स ग्रुपसह आयोजकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 10:19 AM2022-01-23T10:19:20+5:302022-01-23T10:59:11+5:30

दरवर्षी १७ जानेवारीला बाह्मणी येथे शंकरपटाचे आयोजन होत असते. कुही, उमरेड तालुक्यातील ज्या परिसरात शंकरपटाचे आयोजन होते, त्या परिसरात ठिकठिकाणी ‘डान्स शो’ची पत्रके लावण्यात आली होती.

Charges filed against organizers including Alex Dance Group over nude dance viral clip case | ‘न्यूड डान्स’ प्रकरण; एलेक्स डान्स ग्रुपसह आयोजकांवर गुन्हा दाखल

‘न्यूड डान्स’ प्रकरण; एलेक्स डान्स ग्रुपसह आयोजकांवर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात‘न्यूड डान्स’ क्लिपची चौकशी सुरू

उमरेड (नागपूर) : दुपारपासून ते सांयकाळपर्यंत ‘सर्जा-राजा’ची शर्यत आणि रात्र होताच बंद शामियानात ‘न्यूड डान्स’. बीभत्सपणाचा कळस गाठणारा हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यात काही दिवसांपासून सुरू आहे. या ‘न्यूड डान्स’ची क्लीप व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि एलेक्स डान्स ग्रुपच्या ‘त्या’ तरुण-तरुणींवर उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चंद्रशेखर ऊर्फ लाला प्रभूजी मांढरे, सूरज नीळकंठ नागपुरे, अनिल शालीकराम दमके (सर्व, रा. बाम्हणी ता. उमरेड) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघेही या आयोजनात प्रमुख असल्याचे समजते.

शनिवारच्या अंकात ‘लोकमत’ने ‘दिवसा शंकरपट; रात्री शामियानात न्यूड डान्स’ या मथळ्यातील वृत्त प्रकाशित करीत शंकरपटाच्या नावावर सुरू असलेला हा बीभत्सपणा उजेडात आणला होता. यानंतर पोलिसांनी बाह्मणी शिवारातील घटनास्थळ गाठत संपूर्ण चौकशी केली.

दरवर्षी १७ जानेवारीला बाह्मणी येथे शंकरपटाचे आयोजन होत असते. कुही, उमरेड तालुक्यातील ज्या परिसरात शंकरपटाचे आयोजन होते, त्या परिसरात ठिकठिकाणी ‘डान्स शो’ची पत्रके लावण्यात आली होती. या पत्रकात एक मोबाईल क्रमांक आणि या डान्स हंगाम बुकिंगसाठी नागपूर येथील दिघोरी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यातूनच या कार्यक्रमाच्या आयोजकांनी संपर्क साधला असावा आणि ‘एलेक्स डान्स’शो झाल्याची बाब पोलिसांनी व्यक्त केली.

याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात २९४, ११४,१८८,३४ भा.द.वि. सहकलम १३१(अ), ११०, ११२, ११७ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नागपूरला रवाना

डान्स हंगामाचे सादरीकरण करणारे नागपूर येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पत्रकात ‘एलेक्स जुली के हंगामे’ अशी बाब ठळकपणे नमूद आहे. ही एलेक्स जुली कोण, अशी चर्चासुद्धा परिसरात रंगलेली आहे. सादरीकरण करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी उमरेड पोलीस नागपूरला रवाना झाले आहेत.

ही आपली संस्कृती नाही. असला प्रकार माझ्या क्षेत्रात झाला असेल तर नक्कीच दोषींवर कारवाई झाली पाहिजे. भविष्यात अशाप्रकारचे आयोजन होणार नाही, अशी लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका राहणार आहे.

- राजू पारवे, आमदार, उमरेड विधानसभा क्षेत्र

व्हायरल व्हिडिओबाबत चौकशी सुरू असून, या प्रकरणाचा छडा लावू आणि योग्य कारवाई करू.

यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, उमरेड

Web Title: Charges filed against organizers including Alex Dance Group over nude dance viral clip case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.