लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मंजूर केलेली विकासकामे भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी थांबविली आहेत. आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत दिलेले पत्र उघड झाले असून, यामुळे काटोलात पुन्हा राजकीय वादाला फोडणी मिळाली आहे. काटोलात ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढलेले सलील देशमुख यांनी याविरोधात जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करीत इशारा दिला आहे.
काटोल मतदारसंघातील देशमुख-ठाकूर लढाई जुनी आहे. २०१९ मध्ये अनिल देशमुख यांनी चरणसिंग ठाकूर यांचा पराभव केला होता. तर २०२४ मध्ये अनिल देशमुख यांच्या जागेवर निवडणूक लढलेले त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना चरणसिंग ठाकूर यांनी मोठ्या फरकाने पराभूत करीत हिशेब चुकता केला. निवडणुकीच्या प्रचारात अनिल देशमुखांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यावेळी ते प्रकरणही खूप गाजले होते.
आता देशमुखांनी मंजूर केलेली कामे आ. ठाकर यांनी थांबविल्याचे उघड झाल्याने पुन्हा वाद पेटला आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे २० कोटींची कामे अनिल देशमुख आमदार असताना मंजूर करण्यात आली होती. या निधीच्या वितरणाचे आदेशही काढण्यात आले होते. आता ही कामे रद्द करावी, असे पत्र आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना लिहिले आहे. या पत्रावर नेमके काय करावे, याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना मार्गदर्शन मागितले आहे.
मतदारांच्या हक्कासाठी न्यायालयाचे दार ठोठावू
- हे पत्र उघड झाल्यानंतर मंगळवारी सलील देशमुख यांनी परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. द्वेषाच्या राजकारणापोटी भाजपचे आ. चरणसिंग ठाकूर हे जाणीवपूर्वक विकासकामे थांबवीत आहेत, असा आरोप करीत अधिकाऱ्यांनीसुद्धा ही कामे रोखण्यापूर्वी चारवेळा विचार करावा, असा इशारा त्यांनी दिला.
- मतदारांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावू, असेही सलील देशमुख यांनी सांगितले.
त्या कामांमध्ये देशमुखांचा 'इंटरेस्ट' : आ. ठाकूर
- अनिल देशमुख यांनी • सुचविलेल्या कामांची यादी पाहिली असता त्यात त्यांचा विशेष 'इंटरेस्ट' दिसून येतो. पाईप वाल्याचे पोत भरण्यासाठी यापूर्वीही त्यांनी अशीच कामे सुचविली आहेत.
- मतदारसंघात खर्च होणारा पैसा हा योग्य कामांवर व गरज लक्षात घेऊनच खर्च व्हावा, ही आमदार म्हणून माजी जबाबदारी आहे. त्यामुळे आपण ती कामे थांबविली.
- याऐवजी लोकांची मागणी असलेली विकासकामे मंजूर करून जनहिताला प्राधान्य दिले जाईल, असे आ. चरणसिंग ठाकूर यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.