आॅडिशनच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचे ‘चांगभलं’

By Admin | Updated: July 16, 2014 01:14 IST2014-07-16T01:14:32+5:302014-07-16T01:14:32+5:30

आपण एखाद्या कलेत पारंगत आहोत, हे दाखविले की इतरांची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्यात कलेचे काहीही ज्ञान नसलेल्या तथाकथित कलावंतांना स्वनामधन्य झाल्याचे समाधान मिळते.

'Changwala' who cheat the name of the film | आॅडिशनच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचे ‘चांगभलं’

आॅडिशनच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचे ‘चांगभलं’

नागपुरात फसत आहेत नवोदित कलावंत
नागपूर : आपण एखाद्या कलेत पारंगत आहोत, हे दाखविले की इतरांची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्यात कलेचे काहीही ज्ञान नसलेल्या तथाकथित कलावंतांना स्वनामधन्य झाल्याचे समाधान मिळते. थोडे बऱ्यापैकी गाणे म्हणता आले वा एखाद्या नाटकात छोटीशी भूमिका केली की काही लोक स्वत:ला कलावंतही समजतात. येथून स्वप्नरंजनाची दुनिया सुरू होते आणि आपण कुणीतरी ग्रेट कलावंत असण्याच्या नादात थेट चित्रपटात भूमिका करण्याचे स्वप्न पाहिले जाते. पण कुठलीही कला साधनेशिवाय प्राप्त होत नाही, याचे भान नवोदितांना राहात नाही. अशा कलावंतांच्या स्वप्नांना आकार देण्याचे आमिष देऊन उपराजधानीत गोरखधंदा सुरू आहे. आॅडिशनच्या नावावर या प्रकारात अनेकांना आर्थिकदृष्ट्या फसविण्यात आले आहे.
आपण मुंबईच्या एखाद्या प्रॉडक्शन हाऊसचे युनिट आहोत आणि नव्या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहोत, असा कांगावा करून काही लोक नागपुरात येतात. एखाद्या मंगल कार्यालयात किंवा बऱ्यापैकी हॉलमध्ये आॅडिशन आयोजित केली जाते.
कलावंतांना दूरध्वनी केले जातात आणि त्यानंतर आॅडिशनला प्रारंभ होतो. प्रत्येकाकडून २०० ते ५०० रुपये आॅडिशनसाठी वसूल केले जातात. चित्रपटात काम मिळण्याच्या आशेने अनेक महाविद्यालयीन युवक-युवती या आॅडिशनला जातात. त्यातील खरेखोटेपणा तपासला जात नाही. प्रत्येकाकडून किमान २०० ते ५०० रुपये घेतले जात असल्याने बक्कळ पैसा जमा होतो. यातील काही निवडून त्यांना मुंबईला ट्रेनिंगसाठी बोलाविणार असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात नंतर कधीच तसा कॉल येत नाही. तोपर्यंत काही मंडळी आपण चित्रपटातील भूमिकेसाठी निवडले गेल्याच्या आनंदात साऱ्यांनाच सांगत सुटतात; पण नंतर हसे होते.
उपराजधानीत गेल्या वर्षभरात या पद्धतीने अनेक लोक फसविले गेले आहेत. आॅडिशन घेणारे लोक कोण, त्यांचे कुठले प्रॉडक्शन हाऊस आहे, त्याची सत्यासत्यता आणि चित्रपटाचे नाव आदींची काहीही माहिती करून न घेता अनेक युवक चित्रपटात काम करण्यासाठी या मोहाला बळी पडले आहेत. असे लोक वृत्तपत्रात आॅडिशनची जाहिरात देत नाहीत.
एखाद्या कॉलेजमध्ये पोस्टर लावले की चित्रपटात काम करण्यासाठी इच्छुक युवकांची गर्दी ‘माऊथ पब्लिसिटीने’ होते. या प्रकाराला काही खरे रंगकर्मीही बळी पडले. पण त्याचे खरे रूप कळल्यावर नाटकांत काम करणारे कलावंत यापासून दूर झाले.
त्यामुळे नाटकाची माहिती नसणारे पण चित्रपटांच्या ग्लॅमरच्या मोहात पडलेले युवक या प्रकाराचे शिकार आहेत.
याबद्दल जागरूकता निर्माण होत असली तरी आॅडिशन घेणाऱ्यांची सत्यासत्यता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Changwala' who cheat the name of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.