महालगाव-आसोली ग्रा.पं.त सत्तापरिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:27+5:302021-02-14T04:09:27+5:30
कामठी : महालगाव-आसोली गट ग्रा.पं.च्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा समर्थित गटाला धक्का देत काँग्रेस समर्थित पॅनलने सत्तापरिवर्तन केले. ...

महालगाव-आसोली ग्रा.पं.त सत्तापरिवर्तन
कामठी : महालगाव-आसोली गट ग्रा.पं.च्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा समर्थित गटाला धक्का देत काँग्रेस समर्थित पॅनलने सत्तापरिवर्तन केले. येथे सरपंचपदी प्रकाश बाळकृष्ण गजभिये तर उपसरपंचपदी निर्मला ज्ञानेश्वर इंगोले यांची निवड झाली. महालगाव-आसोली गट ग्रामपंचायतवर जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेता अनिल निधान यांच्या गटाचे गत १५ वर्षांपासून वर्चस्व होते. जानेवारीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस समर्थित आघाडीचे चार, भाजपा समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीचे तीन सदस्य आणि तीन भाजपा बंडखोर सदस्य विजयी झाले होते. निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी येथे वॉर्ड क्रमांक ३ मधून निवडणूक लढणारे प्रवीण भगवान धांडे यांनी आत्महत्या केल्याने या वॉर्डातील निवडणूक रद्द करण्यात आली होती. येथे १० जागांसाठी निवडणूक झाली. या ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जातीकरिता राखीव होते. याकरिता काँग्रेस समर्थित पॅनलचे प्रकाश बाळकृष्ण गजभिये एकमेव उमेदवार असल्यामुळे त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदाकरिता काँग्रेस समर्थित पॅनलच्या निर्मला ज्ञानेश्वर इंगोले यांच्याविरोधात भाजप समर्थित पॅनलचे अंताराम ठाकरे रिंगणात होते. जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेता अनिल निधान यांनी भाजप बंडखोर अंताराम ठाकरे यांच्याशी जुळवाजुळव करून त्यांना उपसरपंच पदाचे उमेदवार केले होते. त्याचदरम्यान भाजप समर्थित आघाडीमध्ये फूट पडल्याने चैताली सुरेश उरकुडे या उपसरपंचपदाच्या निवडणुकीकरिता गैरहजर राहिल्या. त्यामुळे उपसरपंचपदी निर्मला ज्ञानेश्वर इंगोले यांना पाच मते मिळाली तर अंताराम ठाकरे यांना चार मते मिळाली. विजयी उमेदवारांचे कामठी तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिनेश ढोले, ललित वैरागडे यांनी अभिनंदन केले.