लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट (सर्कल) आणि गणांची नवीन प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली. सावनेर, हिंगणा व कामठी तालुक्यातील सर्कल रचनेत मोठे बदल झाले असून यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे ५७ गट आणि पंचायत समितीचे ११४ गण सोमवारी जाहीर झाले आहेत. मावळत्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष काँग्रेसच्या मुक्ता कोकडे यांचे गाव पिपळा (डाकबंगला) हे पाटणसावंगी सर्कलमधून काढून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वलनी सर्कलमध्ये टाकण्यात आले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे सलील देशमुख यांचे मेटपांजरा सर्कल नवीन रचनेत गायब झाले आहे. माजी सभापती काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे यांच्या वडोदा सर्कलची रचना बदलली आहे.
माजी उपाध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचे जुने केळवद सर्कलमध्ये फारसा बदल झालेला नाही. केळवद सर्कलमधील हेटी सावंगी हे गाव वाघोडा या नव्या जि. प. सर्कलमध्ये समाविष्ट केले असून त्या बदल्यात हत्तीसरा ग्रामपंचायतीचा समावेश केळवद सर्कलमध्ये करण्यात आला आहे. २०१२ मध्ये कुंभारे यांनी निवडणूक लढविलेल्या तेलकामठी सर्कलमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. माजी विरोधीपक्षनेते भाजपचे आतीश उमरे यांच्या टाकळघाट सर्कलमध्ये बदल केला गेला आहे.
पाटील यांचे सर्कल सेफजिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती भारती पाटील यांचे सोनेगाव निपानी (नागपूर ग्रामीण) जि. प. सर्कल सुरक्षित आहे. या सर्कलमध्ये सोनेगाव निपानी व बाजारगाव असे दोन पंचायत समिती सर्कल व एकूण १९ गावे होती. आता सोनेगाव निपानी पंचायत समितीमधील खडगाव, दुगधामना, सुराबर्डी ही तीन गाये आता दवलामेटी जि. प. सर्कलमध्ये समाविष्ट केले आहे. दुगधामना, सुराबर्डी या दोन्ही गावांत काँग्रेसला चांगली आघाडी मिळाली होती.
कळमेश्वर तालुक्यातील तीनही सर्कल कायमकळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी, थापेवाडा व तेलकामठी या तीनही जि.प. सर्कलमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तालुक्यातील सहाही पंचायत समिती सर्कलदेखील जैसे थे आहेत. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे काटोल तालुका अध्यक्ष मनोहर कुंभारे हे २०१२ मध्ये तेलकामठी सर्कलमधून विजयी झाले होते. २०१७ मध्ये हे सर्कल आरक्षित झाल्याने त्यांनी मोर्चा केळवदकडे वळविला होता. आता पुन्हा ते तेलकामठी सर्कलमध्ये परतण्याची चिन्हे आहेत. गेल्यावेळी जि.प.व.पं.स. च्या सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. विधानसभेत तीनही सर्कलमध्यो भाजप आघाडीवर होते. आता काँग्रेस-भाजपमध्ये लढत पाहायला मिळेल.
उज्ज्वला बोढारे, दिनेश बंग यांचे सर्कल तुटलेहिंगणा तालुक्यात पूर्वी सात सर्कल होते. आता पाच सर्कल झाले. त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण सर्कलची पुनर्रचना झाली आहे. यात माजी सभापती उज्ज्वला बोहारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी जि. प. सदस्य दिनेश बंग यांचे सर्कलही तुटले आहे. येथील सर्वच सदस्यांना नव्या सर्कलसाठी चाचपणी करावी लागणार आहे.
बोढ़ारे यांचे खड़की जि. प. सर्कल होते. त्यात खडकी व नेरी पंचायत समिती सर्कलचा समावेश होता. आता खडकी जिल्हा परिषद सर्कल राहणार नाही. आता कान्होलीबारा नवे जि. प. सर्कल झाले आहे. टाकळघाटचाही समावेश यात करण्यात आला आहे. सावंगी देवळी हे नवे जि. प. सर्कल झाले आहे. नेरी पं. स. सर्कल सावंगी देवळी पंचायत समितीला जोडण्यात आला आहे. सोबतच इसासनी पं. स. मधील सुकळी व मोंढा ही दोन गावेही जोडली आहेत.
टाकळघाट जि. प. सर्कलमध्ये टाकळघाट व कान्होलीबारा पं. स. होत्या. आता सातगाव है नवे पंचायत समिती सर्कल जोडले आहे. इसासनी व गुमगाव या दोन पंचायत समित्या जोडून इसासनी जिल्हा प. सर्कल तयार झाले. शिरूळ ग्रामपंचायत पूर्वी सातगाव पंचायत समितीत होती. तिला गुमगावमध्ये समाविष्ट केले. पूर्वी रायपूर व साचंगी देवळी मिळून रायपूर जि. प. सर्कल होते. आता रायपूर जि. प. सर्कलमध्ये रायपूर व वडधामना पंचायत समिती जोडली. पूर्वी नीलडोह पंचायत समिती होती.
सावनेरमध्ये वाघोडा व चनकापूर नवे सर्कल
सावनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा सर्कल होते. नवीन रचनेत सात सर्कल करण्यात आले असून परिणामी सर्वच सर्कलची रचना बदलण्यात आली आहे. जुने वाकोडी सर्कलऐवजी नवीन वाघोडा व चनकापूर सर्कल निर्माण करण्यात आले आहे. वाघोडा सर्कलमध्ये वाकोडी, केळवद व पाटणसावंगी सर्कलमधील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. चनकापूर सर्कलमध्ये रोहणा, वलनी व चिचोली सर्कलमधील काही गावे जोडण्यात आली आहे. माजी अध्यक्षा मुक्त्ता कोकडे यांच्या पाटणसावंगी सर्कलमधून त्यांचे पिपळा (डा.) गाव आता वलनी सर्कलमध्ये टाकण्यात आले आहे. याचा लाभ कुणाला होईल हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.