काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला
By Admin | Updated: January 25, 2015 00:50 IST2015-01-25T00:50:28+5:302015-01-25T00:50:28+5:30
एका सुशिक्षत दाम्पत्याला जम्मू काश्मीरमध्ये येण्याचे आमंत्रण दिले असता, त्यांनी सुरक्षेची हमी मागितली. जम्मू काश्मीरकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला
काश्मिरी युवकांनी साधला संवाद : ‘छात्र जागृती’ व ‘सरहद’ संस्थेचा उपक्रम
नागपूर : एका सुशिक्षत दाम्पत्याला जम्मू काश्मीरमध्ये येण्याचे आमंत्रण दिले असता, त्यांनी सुरक्षेची हमी मागितली. जम्मू काश्मीरकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. काश्मीरला वेगळ्या नजरेने पाहणे बंद करा. ‘हमारा पैगाम मोहब्बत है जो इन्सानियत चाहता है’, असे अशी कळकळीची विनंती जाहिद भट या काश्मिरी युवकाने केली.
‘छात्र जागृती’ व ‘सरहद’ या संस्थेच्यावतीने शनिवारी धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ‘काश्मीर येथील मुलांशी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तो बोलत होता. अध्यक्षस्थानी आमदार प्रा. अनिल सोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, सरहद संस्थेचे प्रशांत तळणीकर, छात्र जागृतीचे सचिव अॅड. निशांत गांधी उपस्थित होते. यावेळी काश्मिरातील दहशत पीडित विद्यार्थी रिक्झेन चुंडोल, रुबिना अफ जल मीर, स्टॅझिंग दोरेजे, आशित खान व जोगिंदर सिंह उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी हिंदीसोबतच मराठीतीतून संवाद साधताना भट म्हणाला, जम्मू काश्मीरमध्ये सर्वात जास्त भाषा बोलल्या जातात. फुलांचे शहर म्हणूनही त्याची ओळख आहे, असे असताना भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मिरात अराजकता व अस्थिरता दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करीत आहे. आता हे थांबणे आवश्यक आहे. यासाठी काश्मीरचा विकास आणि शिक्षणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. ‘हरमर्ज की दवा पढाई है’, असेही तो म्हणाला.
आपला अनुभव सांगताना जोगिंदर सिंह म्हणाला, चार वर्षाचा होतो तेव्हा, दहशतवाद्यांनी घरावर हल्ला केला. त्या एकाच रात्री माझ्या आई-वडिलांसह १५ नातेवाईक मारले गेले. त्यावेळी माझी १२ वर्षाची मोठी बहीण संतोषादेवी हिने मला तिथून सुखरूप बाहेर काढले. हे थांबायला हवे. काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाने सहकार्य करायला हवे. माझ्या हातात भूतकाळ नव्हता, पण भविष्यकाळ आहे, हाच सकारात्मक विचार प्रत्येकाने करावा, असे आवाहनही त्याने केले.
डॉ. तायवाडे म्हणाले, जम्मू काश्मीरला बदलण्याचे ध्येय या विद्यार्थ्यांनी घेतले आहे. ते बदलेल ही आशा आहे. आतंकवाद हा अन्यायातून येतो. हा अन्याय शांतीच्या मार्गाने दूर करणे आवश्यक आहे, असे म्हणत त्यांनी ‘सरहद’ या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. सोले म्हणाले, जम्मू काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे आणि ते राहील. येथील युवकांमध्ये होत असलेला वैचारिक बदल काश्मीरच्या विकासासाठी आणि शांतीसाठी आवश्यक ठरेल. ‘सरहद’ या संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे आणि याचे चांगले परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक अॅड. निशांत गांधी यांनी केले. ते म्हणाले, काश्मिरातील परिस्थितीची जाणीव देशातील एक कोटी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी असा प्रयत्न करण्यात येत असून या शृंखलेची सुरुवात नागपुरात या कार्यक्रमातून होत आहे. संचालन ओमप्रकाश सोनी यांनी केले तर आभार मुक्ता चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमात या सहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)