फडणवीसांविरोधात टीका केली तर ‘ईंट का जवाब पत्थर से’, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
By योगेश पांडे | Updated: July 11, 2023 18:23 IST2023-07-11T18:20:50+5:302023-07-11T18:23:55+5:30
ठाकरे कमिशनखोर असल्याचा आरोप

फडणवीसांविरोधात टीका केली तर ‘ईंट का जवाब पत्थर से’, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली तर ‘ईंट का जवाब पत्थर से’ देण्यात येईल. त्याच गावात किंवा शहरात त्यांच्याविरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर जर कायदा व सुव्यवस्था बिघडली तर ठाकरेच जबाबदार राहतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस हे नागपुरचे कलंक असल्याचे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. त्यावर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान मंगळवारी बावनकुळे बोलत होते.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तुलना केली तर कोण जास्त कर्तुत्ववान आहे हे लक्षात येईल. फडणवीस यांनी स्वकर्तुत्वाने नगरसेवक ते मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री असा प्रवास केला आहे. तर ठाकरे हे माझे वडील, माझा कॅमेरा, माझी पत्नी व माझा मुलगा हेच बोलत राहीले. उद्धव ठाकरे फडणवीसांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. ते राजकारणाचा स्तर खाली आणत आहे. नागपुरात त्यांनी फडणवीसांचा अपमान केल्यावर आमचे कार्यकर्ते शहरातच त्यांची गाडी रोखू शकत होते. मात्र आम्हाला कायदा व सुव्यवस्था बिघडवायची नाही. परंतु संयमाची सीमा असते. यानंतर ठाकरे यांनी असे वक्तव्य केले तर त्यांच्याविरोधात तेथेच तत्काळ आंदोलन करण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या विकासाचे मोठे प्रकल्प केवळ कमिशनखोरीसाठी थांबविले असा आरोपदेखील त्यांनी लावला. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, प्रदेश प्रवक्ता धर्मपाल मेश्राम, माजी आमदार मिलिंद माने, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, विष्णू चांगदे, अजय बोढारे, सुनील कोढे, जयप्रकाश गुप्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते.
मनोरुग्णालयात जाऊन उपचार घ्या
उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय आहे. तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.