नागपुरप्रमाणे एनएमआरडीएअंतर्गतदेखील परिवहन सेवांचे जाळे उभारणार : चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 20:44 IST2025-11-02T20:43:23+5:302025-11-02T20:44:02+5:30
चार विविध संस्थांच्या माध्यमातून शहर-एनएमआरडीएमध्ये वाहतूक व्यवस्था

नागपुरप्रमाणे एनएमआरडीएअंतर्गतदेखील परिवहन सेवांचे जाळे उभारणार : चंद्रशेखर बावनकुळे
योगेश पांडे
नागपूर : नागपूर शहरासोबतच आता एनएमआरडीएअंतर्गतदेखील परिवहन सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मेट्रो आणि एसटी महामंडळामार्फत एक अभ्यासपूर्ण वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. यांच्या माध्यमातून परिवहन सेवांचे जाळे उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात रविवारी आयोजित पत्रपरिषददेदरम्यान ते बोलत होते.
जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते.
नागपूरच्या २० किलोमीटर परिघात महागनरपालिकेचा परिवहन विभाग तर नागपूर विकास प्राधिकरणामार्फत त्यांच्या हद्दीत असलेल्या सुमारे ६५० गावांसाठी इलेक्ट्रीक बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागपूर महानगर अंतर्गत परिवहन सुविधेसाठी मेट्रो असून उर्वरित भागांसाठी एसटी महामंडळाची सुविधा राहील. २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूर महानगराच्या भविष्यातील गरजा ओळखून वेळोवेळी जे नियोजन करण्यात आले आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
झुडपी जंगलाअंतर्गतची १५ हजार हेक्टर जमीन मोकळी करणार
झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार लवकरच जिल्ह्यातील सुमारे १५ हजार हेक्टर जमीन मोकळी करण्यात येईल. यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तसेच ई नझुल प्रणालीमुळे कार्यप्रणालीचा वेग वाढल्याचे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
६० अंगणवाड्यांना ‘एआय’ची जोड
लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणासह आरोग्याच्या दृष्टीने अंगणवाड्या ह्या अधिक सक्षम होणे आवश्यक होते. आता जिल्हा वार्षिक योजनेची जोड देऊन जिल्ह्यात ४० आधुनिक अंगवाड्यांची उभारणी केली जात आहे. याव्यतिरिक्त ६० अंगणवाड्यांना एआय बेसची जोड देण्यात आल्याची माहिती विनायक महामुनी यांनी दिली.
देशातील पहिला ‘नंदग्राम’ प्रकल्प नागपुरात
रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न हा अत्यंत कुशलतेने हाताळता यावा व यात मोकाट प्राण्यांना कोणतीही बाधा न पोहोचविता त्यांना एका ठिकाणी सुरक्षित ठेवता यावे यादृष्टीने वाठोडा परिसरात नंदग्राम प्रकल्प साकारण्यात येत आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असेल. यात जवळपास ३ हजार ४६० मोकाट जनावरांना जागा उपलब्ध होईल. सुमारे १२२ जनावरांचे मोठे गोठे यात असतील, असे अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.