केंद्रीय आरोग्य पथकाने केली कंटेनमेंट झोनची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:18 IST2021-04-10T00:17:16+5:302021-04-10T00:18:39+5:30
Central Health Squad inspects containment zone केंद्रीय आरोग्य पथक सध्या नागपुरात आहे. शुक्रवारी या पथकाने नागपुरातील विविध झोनमध्ये प्रभावी कंटेनमेंट झोन, कोरोना चाचणी केंद्र तसेच लसीकरण केंद्रांची पाहणी केली.

केंद्रीय आरोग्य पथकाने केली कंटेनमेंट झोनची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय आरोग्य पथक सध्या नागपुरात आहे. शुक्रवारी या पथकाने नागपुरातील विविध झोनमध्ये प्रभावी कंटेनमेंट झोन, कोरोना चाचणी केंद्र तसेच लसीकरण केंद्रांची पाहणी केली. पथकाने कंटेनमेंट झोनमधल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे, नागरिकांना झोनमधून बाहेर जाण्यावर प्रतिबंध लावणे तथा सर्वेक्षण करणारी टीमला बाधितांचे ऑक्सिजनचे प्रमाण तसेच टेम्परेचर तपासण्याचे निर्देश दिले. पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्येही भेट दिली तसेच नेहरूनगर व गांधीबाग झोन अंतर्गत कंटेनमेंट झोनची पाहणी केली.
केंद्रीय आरोग्य पथकामध्ये दिल्लीचे एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. हर्षल साळवे व नागपूर एम्सचे प्रो. डॉ. पी. पी. जोशी यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत नागपूर महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत होते.
पथकाने प्रभाग क्र.३० मधील बिडीपेठ कंटेनमेंट झोन, प्रभाग २८ मध्ये सर्वश्रीनगर दिघोरी, प्रभाग २६ मध्ये सरजू टाऊन वाठोडा कंटेनमेंट क्षेत्राचा दौरा केला तसेच नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केद्र दर्शन कॉलनी येथे कोरोना चाचणी केंद्र व लसीकरण केंद्राची पाहणी केली. पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कोविड रुग्णांची एस.ओ.पी.बद्दल माहिती घेतली.
कोरोनावर नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच कोविड प्रोटोकॉलची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावी व परिणामकारक करण्यावर विशेष भर देण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य पथकाकडून करण्यात आली.