शतकोत्तर दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबरला

By Admin | Updated: July 8, 2014 01:24 IST2014-07-08T01:24:52+5:302014-07-08T01:24:52+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबरला होणारची अशी घोषणा प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी केली आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेनेदेखील

Centennial Convocation ceremony on September 26 | शतकोत्तर दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबरला

शतकोत्तर दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबरला

प्रभारी कुलगुरूंची घोषणा : सर्व अडथळे दूर होणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबरला होणारची अशी घोषणा प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी केली आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेनेदेखील याला मान्यता दिली असून माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सिद्धांतता संमती दिली आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान, ११७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या गुणांच्या वैधतेसंदर्भात डॉ.खडक्कार यांची समिती फेरचौकशी करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी होणार होता. परंतु एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याने पदव्या वैध कशा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यातच समारंभाचे मुख्य अतिथी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा नागपूर दौराच रद्द झाल्याने दीक्षांत समारंभ अनिश्चित काळासाठी समोर ढकलण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने दीक्षांत समारंभ कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मागील महिन्यात परीक्षा मंडळाच्या बैठकीनंतर अनुपकुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु त्यानंतर अवैध पदव्यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या डॉ.खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल अपूर्ण असल्याने ेअद्यापही राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आलाच नसल्याचे समोर आले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात दीक्षांत समारंभ होतो की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली होती.
दरम्यान, संबंधित अहवालासंदर्भात नवीन समिती गठित करण्यात आली असून यात डॉ.खडक्कार, डॉ.के.सी.देशमुख, डॉ.डी.के.अग्रवाल, डॉ.हस्तक, डॉ.नासरे यांचा समावेश आहे. ही समिती संबंधित आरोपांसंदर्भात चौकशी करून लवकरात लवकर आपला अहवाल सादर करेल असे अनुपकुमार यांनी सांगितले. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेने दीक्षांत समारंभासाठी २६ सप्टेंबर या तारखेला हिरवी झेंडी दिली आहे. लवकरच डॉ.कलाम यांना निमंत्रण पत्र पाठविण्यात येईल असेदेखील त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अडथळ्यांवर मात करणारच
पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठाचा शतकोत्तर दीक्षांत समारंभ हे माझ्यासमोरचे सर्वात महत्त्वाचे लक्ष्य आहे. दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु काही व्यक्ती जाणुनबुजून यात अडथळे आणत आहेत. पण या सर्व अडचणींवर आम्ही नक्की मात करू असा विश्वास प्रभारी कुलगुरूंनी व्यक्त केला.
विद्यापीठात वातावरणनिर्मिती करणार
१०० वा दीक्षांत समारंभ ही विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाची बाब आहे. या दीक्षांत समारंभासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून पुढाकार घेण्यात येणार असून याची सुरुवात विद्यापीठाच्या वर्धापन दिवसापासूनच करण्यात येणार आहे. निवृत्त मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल हे या समारंभासाठी येणार असून त्याच सायंकाळी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं.संजीव अभ्यंकर यांच्या स्वररजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती अनुपकुमार यांनी दिली.

Web Title: Centennial Convocation ceremony on September 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.