संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 15:49 IST2024-01-26T15:48:50+5:302024-01-26T15:49:13+5:30
आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले.

संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक
नागपूर : संविधानात दिलेल्या तत्वांवर आधारित आचरण व व्यवहार हा जास्त महत्त्वाचा असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी तिरंगा फडकवत ध्वजवंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.
४० वर्षांअगोदर जर कुणी भारत प्रगतीपथावर चालेल असे म्हटले तर लोक आपली खिल्ली उडवायचे. मात्र आज देश सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची ही आशा आहे ही देश विश्वगुरू झाला पाहिजे. ती आपल्या देशाची क्षमतादेखील आहे. आपल्या देशात २२ जानेवारी व आज एक नव्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. मात्र देशाप्रति असलेली ही भावना केवळ एका दिवसासाठी नको. संविधानातील मुख्य तत्वांचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
यावेळी विविध प्रचारक, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुरक्षादलाच्या जवानांनीदेखील तिरंग्याला सलामी दिली.