सायबर सुरक्षेसह साजरा करा व्हॅलेन्टाईन डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:53+5:302021-02-13T04:09:53+5:30
नागपूर : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून जगभर व्हॅलेन्टाईन डे साजरा केला जातो. या दिवशी आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू व ...

सायबर सुरक्षेसह साजरा करा व्हॅलेन्टाईन डे
नागपूर : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून जगभर व्हॅलेन्टाईन डे साजरा केला जातो. या दिवशी आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू व चॉकलेट दिले जाते. सध्या सर्वत्र कोरोना संक्रमन पसरले असल्यामुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी बहुतेक जन ऑनलाईन व्यवहार करीत आहेत. सायबर सेक्युरिट वेबसाईट चेक पॉईन्टनुसार सायबर गुन्हेगार याचा फायदा घेण्यासाठी सक्रिय झाले आहेत. व्हॅलेन्टाईन शब्द वापरून तयार केलेल्या वेबसाईटद्वारे नागरिकांना जाळ्यात फसवले जात आहे.
सायबर गुन्हेगार वेबसाईटच्या नावात व्हॅलेन्टाईन शब्द वापरून दोन उद्देश साध्य करतात. व्हॅलेन्टाईन डेमध्ये रस असणारे इंटरनेट युजर्स या वेबसाईटकडे आकर्षित होतात, तसेच व्हॅलेन्टाईनवरील इतर अनेक अधिकृत वेबसाईटमुळे बनावट वेबसाईट लक्षात येत नाही. बनावट वेबसाईटद्वारे विविध आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात ताज हॉटेलने गिफ्ट कार्ड ऑफर केल्याचे म्हटले गेले आहे. ताज हॉटेलने या ऑफरचा इन्कार केला आहे; परंतु अनेक जण अशा फसव्या ऑफरला बळी पडतात. गृह मंत्रालयाच्या सायबर दोस्त उपक्रमातून नागरिकांना सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे. नागपूर शहर सायबर सेलनेही फसव्या ऑफरपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे.
--------------------
सुरक्षा टिप्स
१ - फसव्या लिंकवर क्लिक करू नका.
२ - प्रमाणित वेबसाईटवरूनच खरेदी करा
३ - लॉगिनची माहिती कुणालाही सांगू नका
४ - विशेष ऑफर्सपासून सावध रहा
५ - समान डोमेन नेमपासून सावध रहा
६ - वैयक्तिक माहिती जाहीर करू नका.
--------------------
सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा
नागपूरमध्ये व्हॅलेन्टाईन डेशी संबंधित सायबर गुन्हे घडले नाही, तरीपण नागरिकांनी अशा गुन्ह्यापासून सावध रहावे. संशयास्पद लिंक उघडून पाहू नये. व्हॅलेन्टाईन डेशी संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड करू नये. सायबर गुन्हेगार त्याचा दुरुपयोग करू शकतात.
---- डॉ. अशोक बागुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल.