नीरीत सीबीआयची धाड, माजी संचालकांच्या गैरकारभाराची चौकशी
By योगेश पांडे | Updated: July 10, 2024 15:27 IST2024-07-10T15:24:50+5:302024-07-10T15:27:49+5:30
Nagpur : नीरीचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी

CBI raid, probe into NEERI's former director's malpractice
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीआयच्या पथकाने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) परिसरात धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. नीरीचे माजी संचालक डॉ.राकेश कुमार यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी सीबीआयचे पथक करत असून त्याच्याशी निगडीत काही महत्त्वाची कागदपत्रेदेखील जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीबीआयच्या पथकाने बुधवारी सकाळी नीरीत धाड टाकली. त्यांनी विविध कार्यालयांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू केली. आश्चर्याची बाब म्हणजे नीरीतील अनेकांना या प्रकाराची माहितीच नव्हती. दुपारी लंच टाईममध्ये अनेकांना धाड टाकण्यात आली असल्याचे कळाले. नीरीचे माजी संचालक डॉ.राकेश कुमार यांच्या गैरकारभारबाबत सीबीआयकडे तक्रारी पोहोचल्या होत्या. राकेश कुमार यांच्या कार्यकाळात अशा अनेक केवळ आराखडा बनविण्यात आलेल्या संशोधनांवर पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पैसे घेतल्यावर केवळ कागदपत्रे तयार करण्यात आली होती.
विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, त्यातील खर्चावरही आक्षेप घेण्यात आले होते. रिसर्चच्या नावाखाली त्यांनी केलेला सावळागोंधळ, बनावट कंपन्यांच्या नावाने उचललेले कोट्यवधींचे अनुदान इत्यादी आरोपदेखील त्यांच्यावर होते. त्यांना सीएसआयआरने निलंबित केले होते. त्याअगोदर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली होती. या धाडीबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांना कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नीरीच्या दोन वैज्ञानिकांच्या घरीदेखील धाड पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.