ओसीडब्ल्यूच्या कराराची सीबीआय चौकशी करा
By Admin | Updated: October 8, 2015 03:10 IST2015-10-08T03:10:15+5:302015-10-08T03:10:15+5:30
शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू) कंपनीने जुने पाणीमीटर बदलवून नवीन लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.

ओसीडब्ल्यूच्या कराराची सीबीआय चौकशी करा
राष्ट्रवादीची मागणी : महापालिका आयुक्तांना निवेदन
नागपूर : शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू) कंपनीने जुने पाणीमीटर बदलवून नवीन लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. परंतु बाजारातील किमतीच्या तुलनेत मीटरची दुप्पट किंमत वसूल करून शहरातील लोकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे महापालिका व ओसीडब्ल्यू यांच्यात झालेल्या कराराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी यासंदर्भात निवेदन सादर करून चर्चा केली. शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, अनिल अहिरकर, गटनेते राजू नागुलवार, विशाल खांडेकर, अशोक काटले, राजेन्द्र बढीये, अशोक राऊ त, मोरेश्वर जाधव, राधेश्याम वर्मा, संजय शेवाळे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. महापालिका व ओसीडब्ल्यू यांच्यात झालेल्या करारानुसार ओसीडब्ल्यू शहरातील ग्राहकांचे पाणीमीटर बदलवित आहे. हनुमाननगर झोनमधील मीटर बदलविण्याचे काम सुरू आहे. बाजारात ८८७ रुपये किंमत असलेल्या मीटरची १४९२ रुपयाप्रमाणे शुल्क आकारणी केली जात आहे. नळ जोडणीचा प्रत्येकी खर्च १४९४ रुपये येत असताना ३४८४ रुपये वसूल करीत आहेत. लेखा परीक्षकांनीही यावर आक्षेप नोंदविला असल्याचे आर्य यांनी निदर्शनास आणले.
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना ओसीडब्ल्यूकडून निधीचा दुरुपयोग केला जात आहे. आधीच या कंपनीला २६ कोटीचा निधी अतिरिक्त देण्यात आल्याचा आक्षेप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन हर्डीकर यांनी दिले आहे. आयुक्तांंनी १५ दिवसात चौकशी न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू. त्यानंतरही शहरातील नागरिकांना न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याच्या इशारा वेदप्रकाश आर्य यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)