मांजर, माकड अन् मुंगूस दंशाची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST2020-11-26T04:21:14+5:302020-11-26T04:21:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एरवी उपराजधानीत श्वानदंशाची प्रकरणे नियमितपणे समोर येत असतात. मात्र श्वानांसोबतच असेही काही प्राणी ...

Cat, monkey and mongoose bite headaches | मांजर, माकड अन् मुंगूस दंशाची डोकेदुखी

मांजर, माकड अन् मुंगूस दंशाची डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एरवी उपराजधानीत श्वानदंशाची प्रकरणे नियमितपणे समोर येत असतात. मात्र श्वानांसोबतच असेही काही प्राणी आहे ज्यांच्या दंशाची नागपूरकरांना दहशत बसली आहे. एप्रिल २०१७ पासून ४२ महिन्यात शहरात हजारो नागरिकांना चक्क मांजर, माकड आणि मुंगूस यांच्या दंशाचादेखील सामना करावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत श्वानांसोबतच नागपूरकरांना इतक कुठल्या प्राण्यांचा दंश झाला, किती श्वानांची नसबंदी झाली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ४२ महिन्याच्या कालावधीत श्वानानंतर सर्वात जास्त दंश करणारा प्राणी मांजर ठरला. मांजरांनी तब्बल ३ हजार १३ नागरिकांना दंश केला. शहरातील अनेक भागात माकडांची दहशत आहे. माकडे केवळ वस्तूंचीच फेकाफेक करत नाहीत तर अनेकदा नागरिकांवर हल्लादेखील करतात. माकडांनी ५८४ नागपूरकरांना चावा घेतला.

अनेक वस्त्यांमध्ये मुंगूसदेखील दिसून येतात. सर्वसाधारणत: मनुष्य दिसला की मुंगूस धूम ठोकतात. मात्र याच मुंगूसांच्या दंशाचा २१४ जणांना सामना करावा लागला. इतकेच काय तर घोडा, उंदीर, ससा या प्राण्यांच्या दंशांच्या प्रकरणांची देखील मनपाकडे नोंद झाली आहे.

नसबंदीचे प्रमाण वाढविण्याची गरज

शहरात भटक्या श्वानांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०२० या ३० महिन्यांच्या कालावधीत ११ हजार ४०४ श्वानांची नसबंदी करण्यात आली. श्वानांची संख्या लक्षात घेता नसबंदीचा आकडा वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन’च्या संचालिका स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.

प्राण्यांच्या दंशांची आकडेवारी

प्राणी-२०१७-२८-२०१८-१९-२०१९-२०- २०२० (सप्टेंबरपर्यंत)

माकड- ७९ - २४७ - २५६ -२

उंदीर- ११३ - २५४ - २२५ -६

घोडा- १२ -२-७-०

ससा -१- १५ - २८ -०

डुक्कर- २० - १३१ - ६७ -०

मुंगूस- १३ - ८५ - ११४ -०

Web Title: Cat, monkey and mongoose bite headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.