नागपूर एमआयडीसीत एकतर्फी प्रेमातून आरोपीचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:15 IST2018-07-14T23:10:09+5:302018-07-14T23:15:55+5:30
एकतर्फी प्रेमातून एका आरोपीने एमआयडीसीतील एका महिलेच्या (वय ४३) घरात शिरून हैदोस घातला. घरातील भांडी आणि साहित्य फेकून महिलेला आणि तिच्या मुलीला (वय १९) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली.

नागपूर एमआयडीसीत एकतर्फी प्रेमातून आरोपीचा हैदोस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका आरोपीने एमआयडीसीतील एका महिलेच्या (वय ४३) घरात शिरून हैदोस घातला. घरातील भांडी आणि साहित्य फेकून महिलेला आणि तिच्या मुलीला (वय १९) अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. त्याच्या अर्धा तासानंतर याच आरोपीने प्रतापनगरात चाकूच्या धाकावर एका युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. हिमांशू चंद्राकर (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. तो गजानन नगरात राहतो.
हिमांशूचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. तो तिला जबरदस्तीने फोन करतो, तिचा पाठलाग करून वेळोवेळी तिला शिवीगाळ करून तिचा विनयभंग करतो. बदनामीच्या धाकामुळे युवती गप्प बसली आहे. त्यामुळे आरोपी निर्ढावला. त्याने शुक्रवारी रात्री युवतीच्या घरात शिरून हैदोस घातला. मायलेकींना चाकूचा धाक दाखवून अश्लील शिवीगाळ केली आणि धमकी देत घरातील साहित्याची फेकाफेक केली. तेथून पळ काढल्यानंतर आरोपी प्रतापनगरात आला.
रात्री ७.३० च्या सुमारास चेतन मोहनराव नागपूरकर (वय १७, रा. जयताळा) हा बँक आॅफ बडोदासमोर उभा होता. आरोपी त्याच्याजवळ आला. त्याने चेतनला त्या युवतीला बोलवून दे म्हटले. चेतनने नकार दिल्यामुळे आरोपीने चाकूचा धाक दाखवत त्याला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले. एका निर्माणाधीन इमारतीत नेऊन आरोपीने चेतनला मारहाण केली. तू तिला बोलवून दिले नाही तर जीवे मारेन, अशी धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करीत आरोपी पळून गेला. चेतनने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अपहरण तसेच मारहाण करून धमकी देण्याच्या आरोपावरून हिमांशू चंद्राकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली. तर, एमआयडीसी ठाण्यात महिलेने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
---
मजनूगिरीचे चढले भूत
आरोपी हिमांशू चंद्राकर हा पिझ्जा डिलिव्हरीचे काम करतो. त्याच्यावर सध्या मजनूगिरीचे भूत चढले असल्यासारखा तो वागतो. त्याच्यावर मारहाणीचे अन्य दोन गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस सांगतात.
---