विदर्भातील व्यंगचित्रकार एक पाऊल पुढेच
By Admin | Updated: December 23, 2014 00:36 IST2014-12-23T00:36:59+5:302014-12-23T00:36:59+5:30
शहरात पहिल्यांदाच व्यंगचित्रांचे असे आगळेवेगळे प्रदर्शन बघायला मिळाले. या प्रदर्शनातील व्यंगचित्रे बघून मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की विदर्भातील व्यंगचित्रकार कुठेच कमी नाहीत.

विदर्भातील व्यंगचित्रकार एक पाऊल पुढेच
कार्टुनिस्ट झोन : महापौरांच्या हस्ते झाले उद्घाटन
नागपूर : शहरात पहिल्यांदाच व्यंगचित्रांचे असे आगळेवेगळे प्रदर्शन बघायला मिळाले. या प्रदर्शनातील व्यंगचित्रे बघून मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की विदर्भातील व्यंगचित्रकार कुठेच कमी नाहीत. उलट ते एक पाऊल पुढेच आहेत, असे गौरवोद्वगार महापौर प्रवीण दटके यांनी काढले. कार्टूनिस्ट झोनतर्फे आयोजित व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
वैदर्भीय व्यंगचित्रकारांचे चित्रांचे हे प्रदर्शन सध्या दक्षिण- मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाईन्स् येथील कलाविथिक दालनात सुरू आहे. २२ ते २४ डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी खुले राहणार असून यात प्रख्यात व्यंगचित्रकारांचे प्रात्यक्षिक व कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली आहे. या उद्घाटनीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, दक्षिण -मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांचे संचालक डॉ. पीयूष कुमार, मनपा स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी उपस्थित होते.
गिरीश गांधी यांनी सर्व व्यंगचित्रकारांचे अभिनंदन करीत विदर्भातील माणूस हा मोठा असतो मात्र एकत्रित येत नसल्याने मागे पडतो, अशी खंत व्यक्त केली. पण, यासोबतच कलेच्या या प्रवासात कुठे काही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वासही कलावंतांना दिला. या उद्घाटनीय सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सर्व व्यंगचित्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)