कार्टेल तुपाशी एमआयएल उपाशी!
By Admin | Updated: February 5, 2015 01:14 IST2015-02-05T01:14:56+5:302015-02-05T01:14:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणारी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही कंपनी विमानतळावर आणि बाहेरील दर्शनी भागात लावलेल्या

कार्टेल तुपाशी एमआयएल उपाशी!
नियमांचे उल्लंघन : महसुली उत्पन्नात घट
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणारी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही कंपनी विमानतळावर आणि बाहेरील दर्शनी भागात लावलेल्या जाहिरातींच्या अटी व नियमांचे सपशेल उल्लंघन करणाऱ्या कंपनीवर एवढी मेहरबान का, असा प्रश्न जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांना पडला आहे. यामुळे ‘एमआयएल’ला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.
विमानतळावर जाहिरातीचे सिनेजेस, बोर्ड आणि होर्डिंग लावण्याचे कंत्राट कार्टेल आऊटडोअर अॅडव्हर्टर्स या कंपनीला आॅक्टोबर २०१३ मध्ये देण्यात आले. निविदेच्या कागदपत्रांमध्ये ‘एमआयएल’ने प्रत्येक बोर्ड, रस्त्याच्या बाजूकडील सिनेजेस, होर्डिंग आणि तंतोतंत आकाराचा उल्लेख केला आहे.
एमआयएने कार्टेल कंपनीला जवळपास ७ हजार चौरस फूट जागा जाहिरातींचे १०९ सिनेजेस, बिलबोर्ड आणि होर्डिंग टर्मिनल इमारतीच्या आत आणि बाहेर तसेच प्राईड हॉटेलसमोरील टी-पॉर्इंटपासून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यास परवानगी दिली आहे. त्यावेळी हे संपूर्ण कंत्राट दरमहा १२.५० लाख रुपयांचे होते.
नियमांचे सपशेल उल्लंघन
कार्टेल कंपनीने पुन्हा नवीन जागा शोधून तिथे जाहिराती लावण्याची परवानगी ‘एमआयएल’कडे मागितली. ‘एमआयएल’ने यावर वेगळ्या निविदा न मागविता कार्टेल कंपनीला जुन्या दरानेच जाहिराती लावण्याची परवानगी दिली. त्यामुळे कार्टेल आता दरमहा मूळ १२.५० लाख रुपयांऐवजी १५ लाख रुपयांचा भरणा करीत आहे. येथे ‘एमआयएल’चे महसुली उत्पन्न वाढल्याचे दिसून येते. पण खरी बोंब अशी आहे की, ‘एमआयएल’ने जाहिरात कंपनीला एका कराराद्वारे बिल बोर्डाचे आकार आणि संख्या वाढवून दिली आहे. विमानतळावर जाहिराती लावण्यासाठी दरवर्षी निविदा मागविल्या तर ‘एमआयएल’ला दर महिन्याला मिळणाऱ्या १५ लाख रुपयांऐवजी अनेक पटीने महसूल मिळू शकतो. ‘एमआयएल’च्या उत्पन्नात घट होत असल्याचे माहीत असतानाही ‘एमआयएल’ ही ‘कार्टेल जाहिरात कंपनीला मुक्तहस्ते सूट देत आहे.