बेदरकार कारचालकाने घेतला चिमुकलीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:10 IST2021-03-01T04:10:16+5:302021-03-01T04:10:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कारचालकाने एका चिमुकलीला चिरडले. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास हा ...

बेदरकार कारचालकाने घेतला चिमुकलीचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कारचालकाने एका चिमुकलीला चिरडले. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला, तर दुपारी वाठोड्यात एका टँकरचालकाने दुचाकीचालकाचा बळी घेतला.
पारडीच्या सत्यमनगरात राहणारे शाकिब मुन्नवर अंसारी (वय २०) यांची दीड वर्षीय भाची सबनूर घरासमोर खेळत होती. सकाळी ८.३० ते ८.४० च्या सुमारास बेदरकारपणे आलेल्या अर्टिका कार (एमएच ४९ - बीबी ३५१८) चा चालक कपिल अरविंद पटले (वय २९, रा. गुलमोहरनगर) याने चिमुकल्या सबनूरला चिरडले. या अपघातामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली. अपघाताचे वृत्त कळताच पारडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शाकिबच्या तक्रारीवरून आरोपी कपिल पटले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या अपघातानंतर वाठोड्यातील चांदमारी मंदिराच्या अलीकडे दुपारी १.२० च्या सुमारास असाच एक अपघात घडला. राजेश डोमार शाहू (वय ३५, रा. भांडेवाडी, पारडी) याला आरोपी टँकर (एमएच ४९ - सी ४७०१) च्या चालकाने जोरदार धडक मारली. टँकर खाली आल्याने शाहू जागीच गतप्राण झाला. स्वाती गणेश पटले (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---