आयुष्याच्या सायंकाळी थरथरत्या जीवाची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:00 PM2020-06-26T23:00:00+5:302020-06-26T23:00:05+5:30

आधीच वृद्धत्व आणि एकाकीपणाचे चटके सोसणाऱ्या थरथरत्या वृद्ध जीवाची आयुष्याच्या सायंकाळी हेळसांड चालली आहे. मंगला काळे असे या दुर्दैवी आजीबाईचे नाव आहे.

The care of the trembling soul in the evening of life | आयुष्याच्या सायंकाळी थरथरत्या जीवाची हेळसांड

आयुष्याच्या सायंकाळी थरथरत्या जीवाची हेळसांड

Next
ठळक मुद्देसर्वकाही असताना आजींची दैना कुणीच थारा देईना

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजूबाजूला सर्व काही आहे; मात्र साथ कुणाचीच नाही. आधी आप्तस्वकीय, नंतर हक्काचा जोडीदार आणि आता स्मरणशक्तीही साथ सोडू पाहत आहे. त्यामुळे आधीच वृद्धत्व आणि एकाकीपणाचे चटके सोसणाऱ्या थरथरत्या वृद्ध जीवाची आयुष्याच्या सायंकाळी हेळसांड चालली आहे. मंगला काळे असे या दुर्दैवी आजीबाईचे नाव आहे.

पोलिसांच्या सांगण्यानुसार त्यांचे वय अंदाजे ७० ते ७५ वर्षे आहे. हिंगणा मार्गावरील अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये त्यांच्या स्वत:च्या मालकीचा फ्लॅट आहे. त्यांना पतीची पेन्शनही मिळते म्हणे. तिथे त्या एकट्याच राहायच्या. त्या काय आणि कशा खात, घेत असाव्यात, त्यांचे त्यांनाच माहीत. १५ जूनला एमआयडीसी पोलिसांना त्यांच्या शेजारच्या व्यक्तींनी त्यांची तब्येत चांगली नसल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिस पोहचले. अ‍ॅम्ब्युलन्सही आणली. मंगला आजींना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे नऊ दिवस उपचार झाल्यानंतर आजीला बऱ्यापैकी हुरूप आला. डॉक्टरांनी त्यांना २४ जूनला रुग्णालयातून सुटी दिली. डॉक्टरांनी एमआयडीसी पोलिसांना तसे कळविले. त्यामुळे पोलीस मेडिकलमध्ये आजीला घ्यायला पोहोचले. आता एकट्या आजींना त्यांच्या फ्लॅटमध्ये कसे ठेवायचे, असा प्रश्­न होता. पोलीस ठाण्यात कोण, कसा येतो, हे सांगण्याची सोय नाही. आजींना इन्फेक्शन होऊ नये म्हणून पोलिसांनी २४ जूनला रात्री आजींची एका शाळेत व्यवस्था केली. त्यांच्या नातेवाईकांची पोलिसांनी माहिती काढली. मंगला आजींना दोन बहिणी आणि एक भाऊ असल्याचे कळाल्याने पोलीस प्रोत्साहित झाले. भाऊ नागपुरातील रामदासपेठमध्येच राहतो. त्यामुळे त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. मात्र भावाचा प्रतिसाद पोलिसांना गप्पगार करणारा ठरला.

आजीला एकटीला तिच्या घरात ठेवले तर तिच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार होईल. कारण ती स्वत: कोणतेही काम करू शकत नाही. आजीला नीट आठवत नाही आणि कळतही नाही. त्यामुळे तिला कुठे ठेवावे, असा प्रश्न आता पोलिसांसमोर होता. त्यामुळे पोलिसांनी सिव्हिल लाईन्समधील एका वसतिगृहात आजींची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे गुरुवारी पोलिसांनी पाटणकर चौकातील शासकीय वसतिगृहात आजीला ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार

पोलिसांनी तेथे संपर्क साधला. येथे निराधार, अनाथ, भिक्षेकरी यांनाच ठेवता येते. कायद्यानुसार आजीला येथे ठेवता येणार नसल्याचे, वसतिगृहातून सांगितले गेले. परिणामी २५ जूनला ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना एक विनंतीपत्र लिहून आजीला शासकीय वसतिगृहात ठेवण्याबाबत परवानगी आदेश मिळावे, अशी विनंती केली. न्यायालयाने लगेच ते मान्य केले. त्यानुसार रूपाली खनते नामक महिला शिपाई आजीला सायंकाळी पाटणकर चौकात घेऊन गेली. तेथील काळजीवाहक आणि अन्य अधिकाऱ्यांनी आजीला आश्रय देण्यासाठी नकारघंटा वाजविली. हे प्रकरण एका पत्रकाराला कळले. त्याने वरिष्ठांशी बोलणी केली. न्यायालयाचे आदेश आपणास लागू होत नाहीत का, अशी विचारणा केली आणि रात्री ८.३० च्या सुमारास अखेर मंगला आजी वसतिगृहात दाखल झाली.

...तर असे करावे!
मंगला आजीचे वय आणि एकूणच अवस्था बघता त्या किती दिवस जगणार, हा प्रश्न आहे. त्या गेल्यानंतर त्यांच्या मालकीच्या फ्लॅटवर ताबा घेण्यासाठी नातेवाईक तत्परता दाखवतील, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची गरज न लगे. मात्र मंगला आजीची जिवंतपणी कोणतीही दखल न घेणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना मंगला आजीच्या संपत्तीवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. याच प्रश्नातून आजीची ही सदनिका शासनाने ताब्यात घेऊन त्यातून महिन्याला भाड्याच्या रूपात जे काही उत्पन्न मिळेल ते वृद्ध आणि अनाथांसाठी काम करणाऱ्या संस्थांना द्यावे, अशी भावनाही पुढे आली आहे.

 

Web Title: The care of the trembling soul in the evening of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.