सावनेर : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार राेडलगतच्या खड्ड्यात शिरली आणि उलटली. त्यात कारचालकाचा मृत्यू झाला असून, १२ वर्षीय बालक जखमी झाला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-कळमेश्वर मार्गावर शनिवारी (दि. १२) रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.
रवी सत्यनारायण पुरे (२८, रा. मस्के ले-आऊट, वाघाेडा) असे मृताचे तर लाेकेश प्रल्हाद वैद्य (१२, रा. सीताबर्डी, नागपूर) असे जखमीचे नाव आहे. लाेकेश हा रवीचा साळा हाेय. दाेघेही एमएच-३१/सीआर-३७४ क्रमांकाच्या कारने सावनेरहून कळमेश्वरच्या दिशेने जात हाेते. सावनेर शहरातील यशवंतबाबा झाेपडपट्टीजवळ रवीचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि कार राेडलगतच्या खड्ड्यात शिरल्याने उलटली. त्यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही लगेच शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती रवीला मृत घाेषित केले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.