मोटरसायकलला धडकून कार उलटली ,९ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:47 IST2018-10-12T23:45:55+5:302018-10-12T23:47:42+5:30
समोरील मोटरसायकलला धडक दिल्यानंतर वेगात असलेली कार रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन उलटली. त्यात दुचाकीवरील चौघे गंभीर तर कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्गावरील बोर्डा शिवारात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

मोटरसायकलला धडकून कार उलटली ,९ जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: समोरील मोटरसायकलला धडक दिल्यानंतर वेगात असलेली कार रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन उलटली. त्यात दुचाकीवरील चौघे गंभीर तर कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्गावरील बोर्डा शिवारात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
गंभीर जखमींमध्ये रामगोविंद बच्चालाल यादव (२८), त्याची पत्नी गरिमा यादव (२६), मुलगा सूर्यांश (३), मुलगी काव्या (६) रा. गजानननगर, नागपूर यांचा तर किरकोळ जखमींमध्ये चुंगेश्वर मुरारी नाकतोडे, ध्यानचंद महादेव बुरेवार (५४), शेखर चिंतामण श्रीरामे (५७), सरिता चुंगेश्वर नाकतोडे व मिलिंद विठ्ठलराव वानखेडे, सर्व रा. नागपूर यांचा समावेश आहे. यादव कुटुंबीय एमएच-४०/आर-४५२१ क्रमांकाच्या मोटरसायकलने रामटेकच्या दिशेने जात होते. तर चुंगेश्वर नाकतोडे व त्यांचे सहकारी एमएच-४०/एसी-५४२१ क्रमांकाच्या कारने रामटेकला एका कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी जात होते.
दरम्यान, बोर्डा शिवारात कारने समोर असलेल्या मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला व ती कार रोडच्या कडेला जाऊन उलटली. यात सर्वजण जखमी झाले. त्यांना लगेच कन्हान शासकीय रुग्णालयात आणले. तिथे सर्वांवर उपचार केल्यानंतर किरकोळ जखमींना सुटी देण्यात आली तर गंभीर जखमींना कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी कारचालक चुंगेश्वर नाकतोडे यांच्याविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.