रोहित्राची क्षमता वाढली, ४० गावांना योग्य दाबाचा वीजपुरवठा
By आनंद डेकाटे | Updated: May 18, 2024 15:11 IST2024-05-18T15:10:54+5:302024-05-18T15:11:47+5:30
Nagpur : ४० गावातील शेतकरी तसेच घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा व शाश्वत वीजपुरवठा मिळण्यास मदत

Capacity of Rohitra increased, proper pressure power supply to 40 villages
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या मौदा विभागा अंतर्गत असलेल्या ३३/११ केवी अरोली उपकेंद्रातील ५ एमव्हीए रोहीत्राची क्षमतावाढ करुन त्यास १० एमव्हीए करण्यात आली. कृषी पंप वीज जोडणी धोरणानुसार करण्यात आलेल्या या रोहीत्राच्या क्षमतावाढीमुळे अरोली उपकेंद्र अंतर्गत असलेल्या ४० गावातील शेतकरी तसेच घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा व शाश्वत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
या नवीन रोहीत्राची चाचणी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि नागपूर ग्रामीण अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कृषी पंप वीज धोरण- २०२० अंतर्गत वसुल झालेल्या थकबाकीतील रकमेचा वापर करुन संबंधित ग्रामिण भागातील नवीन वीजेच्या पायाभुत सुविधा उभारणी अथवा असलेल्या पायाभुत सुविधेच्या सक्षमीकरणासाठी केला जातो. याच निधीमधून ऐरोली येथील उपकेंग्रातील रोहीत्राची क्षमतावाढ करण्यात आली. रोहीत्राच्या चाचणी प्रसंगी मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे, चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र निचत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल पांडे, रामटेक उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भारत बालपांडे आणि सहायक अभियंता सुभाष चवरे व नितीन महाडिक यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.