कागदपत्र जुळवण्यात उमेदवारांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:48+5:302020-12-30T04:11:48+5:30

भिवापूर : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच ग्राणीण भागातील वातावरण तापायला सुरुवात झाली. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत मैदानात उतरण्याची ...

Candidates have difficulty in matching documents | कागदपत्र जुळवण्यात उमेदवारांची दमछाक

कागदपत्र जुळवण्यात उमेदवारांची दमछाक

भिवापूर : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच ग्राणीण भागातील वातावरण तापायला सुरुवात झाली. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत मैदानात उतरण्याची तयारी चालविली. असे असताना अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवसाचा कालावधी शिल्लक असताना तालुका निवडणूक विभागाकडे एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. कागदपत्रांची जुळवाजुळव आणि सलग आलेल्या तीन दिवसाच्या सुट्या त्याला कारणीभूत ठरल्या आहेत.

तालुक्यात पुल्लर, आलेसूर, मोखाबर्डी या तीन ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीत प्रत्येकी ३ प्रभाग आणि प्रत्येकी ९ सदस्य अशा प्रकारे २७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात २,८१४ पुरुष व २,७०६ महिला असे एकूण ५,५२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. तिन्ही ग्रामपंचायतीत इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे पक्ष समर्थित पॅनलची उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींचीसुद्धा गोची होत आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या प्रत्येकाने अर्ज भरण्याची तयारी चालविली. मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची दमछाक होत असल्याचा सूर उमटत आहे. त्यातल्यात्यात ख्रिसमसमुळे शुक्रवारपासून सलग तीन दिवस शासकीय सुट्या आल्या. त्यामुळे दाखले, प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी ताटकळत राहावे लागले. सोमवारी सर्वच शासकीय कार्यालयाची दारे उघडी झाली. दरम्यान, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तालुकास्थळावर उमेदवारांची चांगलीच गर्दी होती. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल होईल, अशी आशा होती. मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही. आता शेवटच्या दोन दिवसात अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार अनिरुद्ध कांबळे तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत कृषी अधिकारी रवींद्र राठोड आहेत.

Web Title: Candidates have difficulty in matching documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.