चोरीच्या गुन्ह्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:58 IST2019-03-05T22:56:52+5:302019-03-05T22:58:20+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झालेली चोरी कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. अजनी पोलिसांनी ४८ तासाच्या आत चोरीचा छडा लावून हॉस्पिटलचा कर्मचारी रत्नाकर दशरथ निनावे (३२) रा. राहुलनगर, सोनेगाव यास अटक केली आहे.

चोरीच्या गुन्ह्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झालेली चोरी कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. अजनी पोलिसांनी ४८ तासाच्या आत चोरीचा छडा लावून हॉस्पिटलचा कर्मचारी रत्नाकर दशरथ निनावे (३२) रा. राहुलनगर, सोनेगाव यास अटक केली आहे.
हॉस्पिटलचे लेखापाल हजारे यांनी २३ फेब्रुवारीला ८३ हजार रुपये लेखा विभागाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते. हजारे यांनी आपल्या कक्षाला कुलूप लावून चावी सुरक्षा रक्षकाकडे सोपविली. २५ फेब्रुवारीला चोरी झाल्याचे उघड झाले. ड्रॉवर उघडून रक्कम पळविण्यात आली होती. विशेष कार्य अधिकारी शहिद अली यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासातच पोलिसांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याची शंका आली. पोलिसांनी हॉस्पिटलचा सुरक्षा रक्षक आणि इतरांची चौकशी केली. चौकशीत रत्नाकर निनावे याच्यावर शंका आली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने चोरी केल्याचे मान्य केले नाही. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला. रत्नाकर हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिशियनच काम करतो. त्याने गार्डची नजर चुकवून लेखा विभागाच्या कक्षाची चावी मिळविली. ड्रॉवरमधील रक्कम चोरी केली. पोलिसांनी त्याच्या माहितीवरुन खोली क्रमांक ४८ मध्ये ठेवलेले ६७ हजार रुपये जप्त केले. त्याने १६ हजार रुपये दुचाकीची दुरुस्ती, जुगार आणि दारूत उडविले. रत्नाकर आठ वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. त्याला दारूचे आणि जुगाराचे व्यसन आहे. व्यसनामुळे तो कर्जबाजारी झाला आहे. त्याला हॉस्पिटलच्या लेखा विभागात पैसे असल्याची माहिती मिळाली. हॉस्पिटलच्या कामाची माहिती असल्यामुळे त्याने चोरीचा बेत आखला. ही कारवाई पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एच.एल. उरलागोंडावार, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भास्कर, उपनिरीक्षक बी.आर. जाधव, वाय.पी. इंगळे, निशा भुते, अनिल ब्राह्मणकर, विलास गजभिये, अमित धेणुसेवक यांनी पार पाडली.