Cancel Ravi Rana's election: Petition in High Court | रवी राणा यांची निवडणूक रद्द करा : हायकोर्टात याचिका
रवी राणा यांची निवडणूक रद्द करा : हायकोर्टात याचिका

ठळक मुद्देउत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा विनंतीसह मतदार सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी राणा यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याचिकेवर ३ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
ऑक्टोबर-२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदी व भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करून विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीमध्ये एक उमेदवार जास्तीतजास्त २८ लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. परंतु, राणा यांनी या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला. जिल्हा निवडणूक खर्च देखरेख समितीच्या चौकशीमध्ये राणा यांनी खर्चाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे समितीने राणा यांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावले होते. याशिवाय राणा यांनी किराणा सामान वितरित करून मतदारांना स्वत:कडे आकर्षित केले. त्यासाठी त्यांनी स्वाभिमान सहायता कार्ड व कुपन छापले होते. राणा यांना मत देणाऱ्यांना १२ वर्षापर्यंत मोफत किराणा वाटप करण्याचे आश्वासन मतदारांना देण्यात आले होते. त्यासंदर्भात व्हाईस मॅसेज तयार करून ते मोबाईलवर व्हायरल करण्यात आले होते. राणा यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना धमकावून केवळ राणा यांनाच मतदान करायला लावले. अनेक ठिकाणी जात व धर्माच्या नावावर मते मागण्यात आली. यासह विविध बाबी लक्षात घेता राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. संदीप चोपडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Cancel Ravi Rana's election: Petition in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.