औषधांवरील जीएसटी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:58 IST2018-07-09T23:57:38+5:302018-07-09T23:58:52+5:30
सर्व औषधे व मेडिकल उपकरणांवर राज्य जीएसटी कर रद्द करण्याच्या मागणीला घेऊन ‘महाराष्ट्र सेल्स अॅण्ड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज्’ असोसिएशनने विधिमंडळावर मोर्चा काढून आपली मागणी रेटून धरली. विशेष म्हणजे, भरपावसातही मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती.

औषधांवरील जीएसटी रद्द करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व औषधे व मेडिकल उपकरणांवर राज्य जीएसटी कर रद्द करण्याच्या मागणीला घेऊन ‘महाराष्ट्र सेल्स अॅण्ड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज्’ असोसिएशनने विधिमंडळावर मोर्चा काढून आपली मागणी रेटून धरली. विशेष म्हणजे, भरपावसातही मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते. यामुळे एक प्रकारचा लाक्षणिक संप पुकारल्यासारखा होता. असोसिएशनचे महसचिव श्रीकांत फोफसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज्’कडून तीन ते पाच हजार रुपये घेऊन औषध उद्योगातील आस्थापने भ्रष्ट पद्धतीने औषध विक्रीचे उद्दिष्ट साध्य करण्यास भाग पाडतात. याला विरोध केला तर जबरदस्ती राजीनामा घेतला जातो किंवा दुसऱ्या राज्यात बदली केली जाते. यावर चाप लावण्यासाठी गेल्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढला होता. आश्वासने मिळाली. परंतु त्याची पूर्तता झाली नाही, म्हणून पुन्हा हा मोर्चा काढला आहे, असेही फोफसे म्हणाले. विशेष म्हणजे, मोर्चाचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत थांबून होते. आठ तासांच्या कामाची अधिसूचना काढावी,कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व श्रीकांत फोफसे, विश्वेश्वर स्वामी, दिलीप देशपांडे, एल.आर. राव, विवेक गोडसे, अभय देव, दिनेश यादव, विनोद गुप्ता आदींनी केले.